पूर्वजन्मीचे कर्म आणि त्याचे फळ
एक महान विठ्ठलभक्त असलेला एक सज्जन नावाचा गृहस्थ पंढरपूर नगरीत कोणे एके काळी राहत होता.त्याचा मांस/मटण विकण्याचा धंदा होता अन ह्यातूनचं तो आपला उदरनिर्वाह करत असे.म्हणून लोक त्याला सज्जन कसाई म्हणत असे.तो एवढा विठ्ठल भक्त होता की असं एकाही क्षण नसेल की त्याच्या मुखी पांडुरंगाचे नाव नसेल….त्याच्या ह्या भक्तीने विठ्ठलही त्याला प्रसन्न झाला होता.त्याचा धंदा एवढा चालायचा की कधी-कधी त्याला जेवायलाही फुरसत मिळत नसे…असेच एके दिवशी त्याच्या दुकानावर खूप गर्दी होती सकाळपासून दुकानावर ग्राहकांची रांगच लागलेली होती.सज्जन सकाळपासून आपलं काम करत होता अगदी प्रामाणिकपणाने,मुखात पांडुरंगाचे नाव आहेच. आता दुपारचा एक वाजला होता. तरी दुकानातून सज्जन कसाईला जेवायला सुट्टी मिळेना…इकडे विठ्ठल-रुक्मिणी हे सगळे बघत होते.तेव्हा रुक्मिणीदेवी पांडुरंगाला म्हणते.
“भगवान, तुमच्या एका भक्ताला जेवायला वेळ मिळेना.दुपारचा एक वाजला आहे,बिचारा सकाळपासून उभा आहे..जा त्याला जेवायला सुट्टी द्या..”
“हो बरोबर आहे तुमचे..मलाही पाहवत नाही त्याचे कष्ट…मला आता जावेच लागेल.” असं भगवान विठ्ठल म्हणत लगेच सज्जन कसाईच्या दुकानावर हजार झाले आणि सज्जन कसाईला जेवायला सुट्टी दिली.
तर अशी ही भक्ती होती सज्जन कसाईची..जिथे स्वतः पांडुरंग त्याची काम करत …..म्हणजे त्याची भक्तीही तेव्हढी श्रेष्ठ असेल.तर हा सज्जन कसाई भजन,अभंग ह्यातून पांडुरंगाच गुणगान करायला कधीही कमी पडत नसे,एकादशीला निरंकार उपवास करणे,नियमित वारीला जाणे.अन मुखात अखंड हरिनामाचा जप करायचा….
तर असेच एके दिवशी सज्जन कसाईच्या मनात आले की जगन्नाथ पुरीला जाऊन यावे.मग काय मनात आले म्हणजे ते पुरे करावे लागणार मग हा विचार आपल्या बायकोला सांगितला आणि एका दिवशी सज्जन कसाई जगन्नाथ पुरीला निघाला एकटाच…..
मजल-दरमजल करत रोज हा माणूस जगन्नाथ पुरीची वाट चालू लागला.दिवसभर चालायचे रात्र झाली का एखाद्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करायचा जे खायला मिळेल ते खायचे..सकाळ झाली का परत आपली वाट धरायची …मुखात सदैव देवाचे नाव.७-८ दिवस गेले त्याची रोजचाच नित्यक्रम .दिवसा पायपीट करायची रात्री आराम करायचा.
एके दिवशी असाच दिवसभर चालून चालून थकलेला सज्जन कसाई…एका घरी मुक्कामी थांबला.त्या घरीच जेवण केले…जेवण झाल्यानंतर त्या घराच्या अंगणातच तो झोपण्यासाठी अंथरून टाकले…आणि दिवसभर थकलेला असल्यामुळे लगेच ततिथे पडून घेतले…उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मस्त गार-गार वारा सुटलेला ..वरती निरभ्र आकाश ..आर्धाकृती चंद्र..बऱ्यापैकी उजेड …टिपूर चांदणे पडलेले…दिवसभर थकलेले शरीर आणि मन अगदी उस्ताही आणि प्रसन्न झाले…..ह्या टिपूर चांदण्याकडे बघताच सज्जन कसाई झोपी गेला….असेच १०-१५ मिनिटे झाली असतील तेच कोणीतरी आपल्याला धक्का दिल्याचे सज्जन कसाईला जाणवले….डोळे उघडून बघितले तर तो चकितच झाला आणि समोर पाहतो तर त्या घराची एक सुंदर तरुण बाई त्याच्यासमोर बसलेली होती…ह्याच माउलीने मला आज जेवण दिले होते हे त्याला ओळखायला वेळ नाही लागला.
“काय ….काय झाले..?” अगदी घाबरलेल्या आवाजात त्याने विचारले.
“घाबरू नका…..” ती तरुण स्त्री अगदी सौम्य आवाजात त्याला म्हणाली.त्याच्या थोडेसे जवळ येत…
“नाही…म्हणजे काही पाहिजे तुम्हाला …” तो तिच्यापासून लांब सरकत…
“काही नाही ..तुम्ही एवढे तेजस्वी आहात..मला तुमच्याशी संबंध ठेवायचे आहे..जेव्हापासून तुम्हाला बघितले तेव्हापासून मला चैनच नाहीये…” ती तरुण स्त्री अगदी लडिवाळ आवाजात बोलत होती….अगदी कोणीही तिच्या जाळ्यात सहज ओढला जाईल अशा प्रकारे…. पण सज्जन कसाई घाबरून गेला आणि तिला समजू लागला..
” नाही माऊली,मी असं नाही करू शकत मी एक विठ्ठल भक्त आहे……..तुम्हाला काही लाज आहे की नाही तुम्ही एक विवाहित आहे अन तुमचे पती तिकडे झोपलेले आहेत ..”
” आहो तुम्ही कोणालाही घाबरू नका ….अगदी माझ्या नवऱ्याला सुद्धा !!” असं म्हणत ती त्याच्या अजूनच जवळ येऊ लागली…
आता मात्र सज्जन कसाई थोडेसे चिडले..आणि त्याने तिला असं बाजूला केले आणि ते तिथून उठून चालायला लागले…
तेव्हढ्यात ती बाई म्हणाली …
” तुम्ही कोणाला घाबरताय…माझ्या नवऱ्याला ” .असं म्हणत म्हणतचं तिने अंगणात असलेली कुऱ्हाड उचलली आणि घरातल्या खोलीत झोपलेल्या आपल्या नवऱ्याच्या मानेवर टाकली..
क्षणात तिने आपल्या नवऱ्याचे शीर आणि धड अलग केले ….हे पाहून तर सज्जन कसाईचा पारा एकदम चढला ..डोळे लाल बुंद झाली..
तेव्हड्यात ती स्त्री त्याच्या दिशेन आली आणि म्हणाली
“आता बघा…मी माझ्या नवऱ्याला पण मारले आहे….आत्ता तुम्हाला कोणालाही घाबरायचे कारण नाही…” कामेच्छेने पेटलेली ती बाई असं म्हणत सज्जन कसाईला येऊन बिलगली ..दुसऱ्याच क्षणी सज्जन कसाईने उलट्या हाताची तिच्या गालफडात लगावली आणि ती अंगणात जाऊन पडली…
“अरे तू बायको आहे का …वैरीण… आपल्या पतीला मारले तू जो की परमेश्वरासामान असतो….परमेश्वर तुला कादापी माफ करणार नाही..” लाल-बुंद झालेले डोळे जणू आग ओकत होते…….असे म्हणत ते चालू लागले ….
हा माणूस काही आपलं ऐकत नाही असं समजल्यावर मात्र ती आता चवताळून पेटली आणि म्हणाली
“थांबा……जाताय कुठे….? माझे ऐकत नाही का ? ” असं म्हणत ती जोर जोराचा आरडा -ओरडा करू लागली..
“वाचवा वाचवा…” असं आरोळी देताच आजूबाजूचे लोक धावत पळत आली आणि काय झाले झाले असे विचारू लागली,लगेच त्या बाईने सांगितले की ह्या माणसाने माझ्या नवऱ्याला मारले..म्हणून…सज्जन कसाईचे काही ऐकून घेण्याच्या आतच त्या जमलेल्या लोकांनी त्याला मारायला सुरवात केली आणि अगदी बेदम मारहाण केली…सज्जन कसाई जमिनीवर कोसळून विव्हळत होता..देवाचा धावा करत होता….त्या जमलेल्या लोकांनी त्या बैला विचारले की काय शिक्षा द्यायची ह्याला म्हणून….
“ह्याचे दोन्ही हात कापून टाका….अगदी मुळापासून…ह्याच हातानी माझ्या नवऱ्याचा खून केला आहे.” असं म्हटल्याबरोबर त्या लोकांनी तिथेच पडलेली कुऱ्हाड घेतली..आणि सज्जन कसाईचे दोन्ही हात काढून टाकले….सज्जन कसाईच्या डोळ्यातून मात्र आता रक्ताच्या धारा चालू होत्या…….हे सगळे झाल्यानंतर जमलेली सगळी मंडळी निघून गेली….रात्रीचे १२-१२:३० वाजले होते..सज्जन कसाई तिथून हळू हळू चालू लागला….मनात असंख्य प्रश्न घेऊन…देवा काय गुन्हा केला होता मी ? का आला नाही माझ्या मदतीला धावून?कुठे माझी भक्ती कमी पडली? काय करू मी आता जागून ? हे सारे प्रश्न त्याला त्याच्या पांडुरंगाला विचारयचे होते…….अंधारातच चालत होता….खांद्यामधून भळाभळा रक्त वाहत होते…..खाली पायाला ठेचा लागत होत्या त्याच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते..आकाशाकडे बघत आता तो काही वेळा पूर्वी सुंदर वाटणाऱ्या चंद्र-चांदण्यामध्ये तो आता आपल्या पांडुरंगाला पाहत होता…..रस्ता कुठे चालला आहे ते काही माहित नव्हते….रात्रीच्या त्या भयाण वेळी फक्त रात-किड्यांचा कीर-कीर आवाज येत होता..असं तो बरेच २-३ मैल चालला असेल …पहाटचे ४-४:३० वाजले होते…एक भल मोठे वडाचे झाड त्याला दिसले..त्याने ठरवले की मी आता इथेचं बसणार आणि मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय आणि माझ्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही म्हणून…असं विचार करत तो तिथेच त्या वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाला…पांडुरंगाच नाव घेत..!!!!!
असाच तास-दीड तास झाला…पांडुरंगाला आपल्या भक्ताची हाक ऐकू आली आणि ते सज्जन कसाईसमोर उभे राहिले ..त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला उभे केले…आपल्या पांडुरंगाला पहिल्या पहिल्या सज्जन कसाई खूप -खूप रडला….रडता-रडताच पांडुरंगाला प्रश्न विचारू लागला..
“का देवा ? का असे झाले? काय गुन्हा केला होता मी…? कुठे माझी भक्ती कमी पडली? त्या स्त्रीची मागणी मी मान्य नाही केली ह्यात काय चुकी होती माझी..?सांग देवा..”
“अरे हो शांत हो सज्जन…!! तुझी ह्यात काही काही चुकी नव्हती….तुझी भक्तीही कुठे कमी नाही पडली….पण हे तुझे पूर्व जन्मीच्या कर्माचे फळ आहेत ..” अगदी शांत आवाजात पांडुरंग त्याला समाजावात होते…
” म्हणजे ? मी समजलो नाही देवा?” थोडाश्या सावरलेल्या सज्जन कसाईने विचारले.
” पूर्व जन्मीच्या कर्माचे भोग कधी कोणाला चुकले नाही आणि चुकाणारही नाही…तू मागच्या जन्मही एक वाटसरू होता…ह्याच वाटेने जाणारा….
तुझे ज्या स्त्रीने हे हाल केले ती स्त्री ही मागच्या जन्मी एक गाय होती आणि त्या स्त्रीचा नवरा हा एक कसाई होता..तू एक दिवस असाच रस्त्याने चालला होता तेव्ह्या त्या कसाईने तुला ती गाय पकडून दे म्हणून सांगितले….आणि तू ती गाय पकडून कसायाच्या हाती सोपवली…त्या कसाईने त्या गायीचे तुकडे तुकडे केले..आणि साऱ्या गावाला वाटून दिले….ह्या केलेल्या कर्माचे फळ तुला अन त्या स्त्रीच्या नवऱ्याला भोगावे लागले ह्या जन्मात….त्या स्त्रीने तिचा बदला चुकता केला ह्या जन्मी…आणि म्हणूनच मला कितीही वाटले तरी मी तुला मदत नाही करू शकलो.”
” मग देवा …ह्यातून काहीच सुटका नाही का माझी….” सज्जन कसाई एकदम शांत झाला होता आता..
” नाही….तुझे भोग तुला भोगावेच लागेल..पण तू एक करू शकतो तू आतापर्यंत चांगलेच काम केले आहे…उरलेल्या आयुष्यात सुद्धा चांगले काम कर आणि अखंड देवाची भक्ती कर ..तुझा पुढचा जन्म नक्कीच चांगला होईल आणि चांगल्या कामी खर्च होईल..”
” ठीक आहे देवा…मी नक्की प्रयत्न करीन.” असं सज्जन कसाईने म्हटल्यानंतर पांडुरंग तिथून अंतर्धान पावले…आणि थोड्या वेळाने दिवस उजाडला……सूर्य समोरच असलेल्या डोंगरातून डोकाऊ लागला…….आपल्या सोनेरी किरणासंगे….आणि सज्जन कसाईने पण आपली वाट पकडली होती…जगन्नाथ पुरी कडे जाणारी…..!!!!!!!!!
[ता.क.:- ही कथा मी एका प्रवचनात ऐकली आहे…तीच इथे मांडली आहे माझ्या शब्दात…कथेचा सार मात्र तोच आहे.प्रतिक्रिया द्यायला विसरू नका]
असेच अनुभवलेले…….थोडसे विचार करायला लावणारे…….!!!
आपल्या जीवनात रोज कोणी न कोणी भेटत असतं.. ……कोणी ओळखीचे …तर कोणी अनोळखीचे…….जे ओळखीचे असतात ते आपल्याला जीवनात ह्या ना त्या मार्गाने प्रभाव पडताच असतात…..पण जे अनोळखीचे असतात ते पण आपल्याला जीवनात काहीतरी शिकवून जातात तर कधी कधी असाच उगाच विचार करायला भाग पाडतात….असाच माझा एक अनुभव इथे मांडतोय….
९-१० दिवसापूर्वी पुण्याकडे येत होतो….संगमनेरहून….नेहमीप्रमाणे एक बस पकडली …आपला लाल डब्बा….जेव्हा बस मध्ये बसलो तेव्हा एक उगाचच एक वेगळी जाणीव व्हायला लागली ………….बसही थोडी रंगीबेरंगीच होती…बसच्या खिडक्यांच्या काचेवर लिहिलेले ..ते “जय भवानी जय शिवाजी..” ” जय महाराष्ट्र……”चे शब्द… एकदम महाराष्ट्र अभिमान जागवत असल्यासारखी वाटणारी…कोपरगाव आगाराची बस होती ती…..तर असो…
माझ्या मुख्य पात्राकडे वळतो…बस कंडक्टर..दाढी वाढवलेला……सावळा रंग असलेला…कपाळाला टीळा लावलेला….उंची चांगली ६ फूटच्या जवळपास…शरीरयष्टी एकदम कडक……. तडफदार आवाज…(ते पुढे समजेलच तुम्हाला)…………
प्रवाशी लोक जोपर्यंत खिशातून पैसे काढत आहे तोपर्यंत हा माणूस आपला त्या प्रवाश्याकडे पाहत राहणार………हाताची घडी घातलेली ..मागच्या सीटला टेकुन….आपली दाढी हळूच कुरवाळत…..एक गुढ नजरेने बघणे…अन जेव्हा लोक २०-२५ रु.च्या तीकीटासाठी १००-५०० च्या नोटा काढायचे तेव्हा मात्र हा माणूस एकदम तडतड करायचा……….
“कोणाकोणाला सुट्टे पैसे देऊ…….?? सुट्टे पैसे द्यायला काय होते तुम्हाला….माझ्याकडे काय बँक आहे का सुट्टे पैश्यांची वैगरे वैगरे…असं बरेच काही …तरीही प्रवाशी लोक मुकाट्याने त्याचे बोल ऐकून घ्यायचे …….कोणी काही बोलत नसे..कारण त्यांना बहुतेक माहित असावे की हा माणूस कुठून न कुठून सुट्टे पैसे देतील म्हणून……..!!!
मी अगदी बसच्या एकदम शेवटून दुसऱ्या-तिसऱ्या सीटवर बसलेलो होतो…….मला ह्या माणसाचे जरा कुतूहल वाटले म्हणून मी आपल्या कुतूहलापोटी त्याच्या प्रत्येक हालचालीवर/बोलण्यावर बारीक लक्ष ठेवून होतो….माझ्यापर्यंत तिकीट काढायला येईपर्यत……
“शिवाजीनगर एक ” मी आपले एकदम जेवढे तिकिटाचे पैसे आहेत तेव्हढे पैसे अगदी सुट्ट्या पैश्यासाहित त्या माणसाच्या हातात दिले…
“ओन्ली वन….!!!फक्त एकाच तिकीट आहे पुण्याचं….आख्या बसमध्ये…बाकी हे सगळे आधले -मधले…..” आपल्या हाताने एक आकड्याची खून करून दाखवत तो एवढ्या मोठ्या आवाजात बोलला कि साऱ्या बस मध्ये आवाज घुमला………
मी असेच थोडे स्मितहास्य केले अन क्षणभर मला मी जसा काही विशेष माणूस आहे असं वाटले….ते थोड्यावेळापुरतेच कारण माझ्या मागे बसलेल्या अजून एका प्रवाश्याने पुण्याचे तिकीट काढले होते……..ते अमराठी असावेत कारण कंडक्टर त्याच्याशी आपले तोडक्या मोडक्या हिंदीत बोलत होते… बर असो..
ह्या कंडक्टरचे सगळ बोलणं आणि सारा अवतार बघून माझ्या शेजारचा एक प्रवाशी म्हटला सुद्धा कि ह्याला येरवड्याला न्यायची गरज आहे म्हणून…!! मी मात्र त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही दिले आणि फक्त ह्या साऱ्या गोष्टीचा आनंद घेत होतो….आलेला क्षण अनुभवायचा……!!
असाच तास -दीड तास झाला……….प्रवाशी चढ-उतार करतच होते…मी आपला ह्या माणसाचे निरीक्षण करतच होतो….
पुढे आल्यानंतर हायवे वर एक अपघात झालेला होता…एक कंटेनर आणि एका तवेरा गाडीची जोरात धडक झालेली होती….त्या तवेरा गाडीचा पूर्ण चुराडा झाला होता…..
“ये देखो इंडिया शायनिंग….” आमचे मुख्य पात्र (कंडक्टर) माझ्या मागे बसलेल्या अमराठी प्रवाश्याशी बोलत होते…हिंदीत…एकदम उच्च आवाजात…!!
“ये शायानिग इंडिया बोलते है…..अपने नेता लोग….और ये देखो कैसे होता है….!!!” त्या झालेल्या अपघाताकडे हात करत ते बोलतच होते…
“हा ना……कायका शायनिंग…!” ते प्रवाशी पण ह्यांना चांगला प्रतिसाद देत होते….मी मात्र आता त्यांच्याकडे आता काय बोलणार म्हणून कान-डोळे दोन्हीपण त्यांच्याकडे रोखून होतो…..
“बहुत अवघड है सब……” ते पुढे बोलतच होते….आपली मराठी हिंदीत कधी घुसडली जाते तेच काही कळत नाही मराठी माणसाला… अन् त्याशिवाय आपण हिंदी बोललो ह्याच समाधान पण वाटत नाही….मराठी माणसाला…असं मला वाटत…
“देखो तुमको बोलता हूँ … ..बहुत अवघड है…..तुमको मालूम नही होगा यहाँ रंजनगाव (रांजणगाव..म्हणायचे असावे बहुतेक पण हिंदी बोलत होते म्हणून..) बहुत अच्छी एकदम फर्स्ट क्लास एमआयडीसी बनी है…”
” हा हा….. पता है………….. ” त्या प्रवाश्याचा दुजोरा…..त्या प्रवाश्याच बोलण् मध्येच तोडत..
“अब वहा के लोगो ने क्या किया उनकी जमीन थी ….अच्छे पैसे मिले..बेच डाली……तो जब पैसा हात में आया तो ..फिर शायनिंग मारते रहे….अच्छे अच्छे हाटेल में खाना खायेंगे ..भारी-भारी गाडी लेंगे…शायनिंग मारेंगे…….और अब वही लोग वहा पे वाचमन का काम करते है….बहुत अवघड है…….और ये सब जगह होनेवाला है…..सब लोग भिकारी बनेंगे…देखना तुम…..!!! त्यांचा पट्टा चालूच होता…इतका जोरात आणि फास्ट कि मला एकदम प्रहार मधला नाना पाटेकरच आठवला…..आणि आपली सगळी चीड तो इतका जोर-जोरात सांगत होता कि सारी बस सुन्न झाली होती….. …………
“सही बात है…” तो अमराठी माणूस….
पण हे जे काही हा माणूस बोलला ते मला एकदम मनाला पटलं …….आताच्या जगात लोक फक्त पैशाची उधळपट्टी करतायेत….पुढचा विचार कोणी नही करत……..फक्त मौज-मज्जा करायची……..फक्त पैसा पाहिजे लोकांना…ना पर्यावरणाचा विचार करायचा की अगदी माणसांचा पण नाही की माणुसकीचा सुद्धा नाही….
बस पुढे चालूच होती….नारायणगावामधून १०-१२ प्रवासी चढले…त्या कंडक्टरची तीच स्टाईल ….लोकांकडे बघणे…….सुट्टे पैसे नही दिले तर तणतण करणे….पण तरीही कोहीही प्रवाशी त्यांच्याशी हुज्जत घालत नही बसले…हे विशेष…
एक २५-२६तला तरुण…. .नारायणगावामधून बसलेला…तिकीट काढायच्या वेळेस १०० ची नोट काढली….आमचे हिरो आता एकदम तापले….
“भाऊ..दोन पन्नास नाहीयेत का?” कंडक्टर
“नाही ना…असते तर दिले असते..” तो तरुण..अगदी सौम्य आवाजात.
” मग कसं तिकीट काढायचं ..सगळे इथे १००-५०० च्या नोटा काढतायेत…कोणाकोणाला…………” त्यांचा तो पट्टा चालू झाला…. “देतो ना..बस मध्ये कोणाकडे तरी सुट्टे बघून देतो….” तो तरुण…
“अरे देतो ….करतो…..असं म्हणणारे खूप आहेत…आश्वासन देऊ नका….पुढाऱ्यासारखे.” असं म्हटल्याबरोबर आम्ही चार-पाचजण हसू लागलो..ते मात्र अगदी रागातच होते…त्यांचा तो रोष आता कदाचित राजकारण्याकडे होता…….. आपल्या नेते मंडळीवर असलेला राग इथे आग ओकत असल्यासारखे बोलत होते…..
” बोलण सोपं असत….. करण अवघड असत…..समजलं का? ” त्यांचा पट्टा चालूच होता…
“नाही नाही खरेच देतो….” तो तरुण प्रवासी असं म्हटल्यावर त्यांनी असेच वाकडा-तिकडा चेहरा करून तिकीट फाडले…मी मात्र ह्या गोष्टींचा विचार करत होतो की अशी माणस राजकारणात का नाहीये………आपला भारत तरी आजच्या भ्रष्टाचारापासून वाचला असता…..
तेवढ्यात तो तरुण आम्हाला म्हणाला की हा कंडक्टर जे काही बोलतो ना….त्याचा मला कधीच राग येत नाही ….मी बऱ्याच वेळा ह्या बस मध्ये जातो….वेळ कसा निघून जातो कळतच नाही..आणि खरच त्यांच्या बोलण्याचा कधीच राग येत नाही..कारण मला माहितेय आतापर्यंत त्याच्याशी कोणीही हुज्जत नाही घातली……….त्याचा प्रवाश्यांशी बोलताना असलेला राग हा फक्त वर –वरचा असेल कदाचित म्हणूनही असेल….
एक ५०-६० च्या वयातली महिला प्रवाशी……लुगड घातलेली….तिलाही पुण्यात जायचे होते…म्हणून तिने १००ची नोट काढली..
“मावशी ..पाच-दहा-पन्नास काही सुट्टे आहेत का..? ” कंडक्टर महाशय त्या महिलेला विचारताय…
“नाही ना ..भाऊ…” ती महिला
“दोन रुपये….चार रुपये…काही सुट्टे ?” ते
“नाही..” ती
“मग किती आहे.?” ते महाशय थोड्या रागातच….
“पाचशेची नोट आहे……देऊ का? ”
ती महिला असं म्हटल्या-म्हटल्या आमचे हिरो एकदम जोरात खळखळून हसले….त्यांच्या दाढीतून दिसणारे…ते पांढरे शुभ्र दात……एकदमच उठून दिसत होते…….आणि आतापर्यंत साऱ्या ३-४ तासाच्या प्रवासात न हसलेला माणूस अगदी दिलखुलासपणे हसल्यामुळे सगळी मंडळी अजून जोरात हसली….अगदी मी सुद्धा….!!!
ह्या सगळ्या गोष्टीत, गडबड गोंधळात पुणे कधी आले समजलेच नाही…आणि ह्या माणसाची स्टाईल, बोलणं, तडतड-तणतण सगळी काही मनात राहणारी………विनोदाचा भाग सोडला तर त्या माणसाचे ते पोटाच्या बेंबीपासून अगदी पोटतिडकीने निघणारे बोल…….काहीसे मनाला विचार करायला लावणारे………….बसमधून उतरलो ते ह्याच आशेने कि ह्या माणसाची कधी तरी पुन्हा भेट होईल म्हणून….!!!
मनाला भावलेल ……………!!
(गावाकडचे थंडीच्या दिवसात दिसणारे नेहमीचे चित्र माझ्या मनाला खूप भावतं…..जेव्हा जेव्हा गावाकडे जातो…तेव्हा तेव्हा असा चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते….
तेच इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न……)
कुडकुडणाऱ्या थंडीचे दिवस ….सकाळची सात-सव्वा-सातची वेळ ….एक भल मोठे कौलारू घर….घरापुढे असणारा ओटा…शेणाने सारवलेला….ओट्यावर बसलेली एक म्हातारी आजी..एकदम जाड भिंगाचा चष्मा असलेली…. बाजूलाच तिची काठी पडलेली…….उन-पहाळे घेत….समोरच असणारी तिची तीन-चार नातवंड…एखाद दुसरी-तिसरीत शिकणारे..एखादी पोरगी चौथीत शिकणारी…फाटके-तुटके स्वेटर घातलेली…दोघंही आपापल्या पुस्तकात पाहून वहीवर काहीतरी लिहिणारे…तो कदाचित डावखुरा…..अभ्यास पूर्ण करायचा एवढंच त्याचं ध्येय असणारी…त्यांच्याच बाजूला असलेली एक दोन-तीन वर्षाची चिमुरडी…उगाचच पुस्तकातील चित्रे न्याहाळत बसलेली….अजून एक एक-दीड वर्षाचा लहानसा चिमुरडा….नुकताच रांगायला लागलेला…..सध्यातरी त्याचे फक्त ओटा एवढेच जग….त्यातून तो बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा…….पण त्याची आजी त्याला आपल्या काठीच्या साह्याने ओट्याच्या बाहेर न जाऊन देणारी……बाजूलाच त्यांची दफ्तर पडलेली….कंपास-पट्टी,पेन्सील सहित…..!!!!
मधेच चिमण्याचा चिव-चिव आवाज….तर एखाद्याच कावळ्याची काव-काव…..ओट्याच्या बाजूलाच असणारे एखाद जास्वंदीचे झाड…..त्याला असणारी चार-पाच फुले….थंडीच्या दिवसात त्यांच्यावर पडलेले दव….जणू ते पण उन-पहाळे घेत असलेले……ओट्याच्याच बाजूला असणारे एक पारिजातकाचे झाड….सारी फुल खाली जमिनीवर पडलेली….एक पांढऱ्याशुभ्र गोधडीसारखे अंथरूण केल्यासारखे…..!!!
ओट्याचाच बाजूला पाट्यावर मिरची वाटत असलेली एक माऊली………..शेजारीच ओट्याच्या खाली मांडलेली एक चूल………त्या चुलीवर भाकरी थापत असलेली एक माऊली……………..
घराच्या एका बाजूला असलेला एक गाडी-रस्ता….तिथून क़्वचितच एखादी मोटार-सायकल किंवा एखाधी सायकल जाणारी…घरापासून थोड्याच अंतरावर असणारा एक जनावरांचा गोठा…….तिथून बैलगाडी घेऊन चाललेला एक जण…..बैलगाडीत भरलेली सगळी औजारे…………..एक काटकुळा म्हातारा ६०-७० च्या वयातला..लाल फेटा घातलेला …कपाळाला गंध लावलेला..गळ्यात माळ असलेला……गोठ्यातली सारी जनावर रानात चरायला घेऊन जाणारा…….जाता जाता घरी आरोळी देऊन दुपारची भाकरी लवकर पाठवा म्हणून सांगणारा………………!!!! असा जवळ-जवळ रोजच्याच जीवनाचा भाग…सगळ काही अगदी सहजच घडणारं….!!
“पिंजरा” ची आठवण
काल असाच ऑफिसमधून घरी जाताना माझा अन माझ्या मित्रांचे बोलणं चालू होते मराठी चित्रपटांबद्दल…..बोलता-बोलता अशीच आठवण झाली मराठी चित्रपट “पिंजरा” ची….आपोआपच पिंजरा चित्रपटाच्या आठवणीत रमून गेलो मी…………
मला आठवतंय मी माझ्या गावात हा चित्रपट पहिला होता..अन् तोही पडद्यावर….हो पडद्यावर…अन् मी स्वत:ला नशीबवान समजतो की मी पडद्यावर “पिंजरा”बघितला..एक अति उत्कृष्ट चित्रपट!!!! साधारण १२-१३ वर्षाची गोष्ट…..आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे यात्रा असते..तर दरवर्षी गावात एक तर तमाशा असतो किंवा एखादा चित्रपट असतो(आताच्या काळात फक्त तमाशेच होतात…….कारण घरोघरी डिश टी.व्ही.,सी.डी/डी.व्ही.डी.प्लेयर आणि भरपूर चैनेलचा सुळसुळाट झाला आहे म्हणून कोणी चित्रपट बघायला पण येत नाही)
हा तर त्या वर्षी अशीच गावाची यात्रा होती..अन् साधारण एप्रिल-मे चे दिवस ..म्हणजेच उन्हाळ्याचे दिवस ..तर त्या काळी मनोरांजानासाठी काय जास्त टी.व्ही.वैगरे नव्हते गावात..म्हणून व्हीसीडी/सीडी/डीव्हीडी प्लेयर ह्यांचाही काही विषय नाही…जेव्हा-जेव्हा काही कार्यक्रम असायचे गावात म्हणजे नाटकं,भारुड,रामलीला,तमाशा कीर्तन,प्रवचने ई.असं काहीही असले का लोकं आवर्जून हजर राहायचे अश्या कार्यक्रमांना,दिवसभर सगळे शेतीत राब-राब राबून थकलेली असायची तरीपण…!!!!
तर अश्याच एक यात्रेच्या दिवशी ‘पिंजरा’ हा सिनेमा ठेवला होता,गावात..तोही पडद्यावर..आता पडद्यावर म्हणजे बहुतेक लोकांना समजले असेल की पडद्यावर सिनेमा कसा असतो..तरीपण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो..पडद्यावर म्हणजे एक भाल मोठे पांढरे-शुभ्र धोतरासारख कापड स्क्रीन म्हणून लावायचे..जवळजवळ १०*१० फूटचे..व्ही.सी.आर.प्लेयर असतो त्याच्या लाईटचा फोकस हा त्या स्क्रीनवर(धोतरावर) धरायचा आणि त्यात सिनेमाची फिल्म टाकायची एका बाजूने आणि जसा जसा सिनेमा पुढे-पुढे जाईल तसे तसे त्या व्ही.सी.आर.ला असणारे चाक फिरवत बसायचे….असच काहीतरी असतं (मी जेव्हा हा सिनेमा बघितला तेव्हा मला एवढेच समजले होते)…आणि आता असे पडद्यावरचे सिनेमे बघायला भेटत नाहीत….
तर त्या दिवशी असच संध्याकाळी समजले की आज गावात “पिंजरा” चित्रपट आहें म्हणून…..मग काय आम्ही सगळी मंडळी खुश होतो..तश्या पण उन्हाळ्याचा सुट्ट्या चालू होत्या..म्हणून अभ्यास वैगरे काही नव्हता…..तसा चित्रपटाचा वेळ ९ वाजताचा होता,पण नेहमीप्रमाणे १० वाजेपर्यन्त चित्रपट चालू होत नाही म्हणून घरून ९ला निघालो होतो..आमचे घर गावापासून दूर आहें म्हणजे शेतात.. गावापासूनजवळ-जवळ २ की.मी.मग आम्ही सर्वजण (भाऊ,आई,मळयातले सगळे मित्र आणि बाकी सगळी बायका-पुरुष मंडळी)गावात निघालो….पायी चालत-चालत……रात्री ९-९:३० ची वेळ..मोकळ आकाश..टिपूर चांदणे पडलेले अन् भला मोठ्ठा चंद्र आम्हाला रस्ता दाखवायला होता…
काय सुंदर वातावरण ते..मस्त टिपूर चांदणे पडलेले..चंद्रपण आमच्या सोबतीला चालणारा..अधून मधून वाऱ्याची झुळूक येणार,रातकिड्यांचा तो कीर-कीर आवाज, अंधाऱ्या रात्री ते लुक-लुक करणारे काजवे,तो खड-खड रस्ता……सार काही काल घडल्यासारखा डोळ्यासमोर येत………..आता असं गावात जाणे होत नाही आणि पहिल्यासारखे गावात कार्यक्रम पण नाही होत….बर असो..तर असच एक एक करत आम्ही गावात पोहोचलो…आणि काही वेळातच चित्रपट चालू झाला…..
त्यावेळी साधा थियटर काय असते ते माहित नव्हते तर मल्टीप्लेक्स तर दूरचीच गोष्ट….!!!
गावच्या मंदिरासमोर असलेल्या मोठ्याशा पटांगणात लावलेला तो पडदा….जराश्या खोलगट भागात तो उभा केलेला होता.सगळी गावकरी मंडळी त्या मैदानावर खालीच जमिनीवर बसलेले..कोणी मांडी खालून बसलेले तर कोणी असेच पाय पसरून बसलेले..पटांगणही मोठे असल्यामुळे जागेचा काही प्रोब्लेम नव्हता…साधारण ३००-३५० लोकं असतील.मस्त सगळी लोकं आरामात बसलेली…..मधून मधून हवेची झुळूक येत होती..मल्टिप्लेक्समधल्या ए.सी. ला पण ह्या हवेची झुळूकची सर् नाहीये हे मी खात्रीने सांगु शकतो…….शेवटी निसर्ग तो निसर्गच..
तसे चित्रपट चालू होण्याचा अगोदर मनात कसलेही पूर्वग्रह/समज,नव्हते की काही नाही…चित्रपट कसा आहें….चांगला की वाईट..चित्रपट कुणाचा आहें,कोणी दिग्दर्शित केलाय,कोण-कोण कलाकार आहेत तेही काही माहित नव्हते..आता जसे एखादा नवीन चित्रपट आला तर त्याची सगळी माहिती घेवूनच तो बघायला जातो..तसे तेव्हा काही नव्हते…अगदी फक्त जो क्षण येतोय त्याचा आनंद घ्यायचा बस एवढेच…!!!!
जेव्हा सिनेमा चालू झाला तेव्हा सुरवातीला तो एवढा मोठा पडदा बघून त्याचे नवलच वाटले होते..त्यात दिसणारे ती माणसं पण एकदम मोठे मोठे दिसत होते…आम्ही बऱ्यापैकी दूर बसलेलो होतो आणि पडदा एकदम असं खोलगट भागात होता म्हणून आम्ही एकदम बाल्कनीत बसल्यासारखे वाटत होते..,पण एक प्रकारचा आनंदच होता..पहिल्यांदाच एवढ्या मोठा पडद्यावर चित्रपट बघत होतो म्हणून….!! ह्याच्यागोदर आम्हाला फक्त रामायण आणि महाभारत बघायची सवय ते पण फक्त आपल्या ब्लँक-व्हाईट टी.व्ही.वर आणि कधी कधी रविवारचा ४ वाजता असणारा मराठी चित्रपट,नँशनल चैनेलवर(त्यात आमचे लक्ष्या-अशोक सराफचे चित्रपट असले की आम्ही ते चित्रपट बघितल्याशिवाय राहत नसे…फक्त तेव्हा आमच्या महाराष्ट्र वीज महावितरण मंडळाची कृपा असली तर..नाहीतरी भारनियमन पाचवीला पुजलेलेच आहें गावाकडे..तेव्हाही आणि अजूनही….!!!)
जेव्हा सिनेमा चालू झाला तेव्हा त्यात फक्त सुरवातीला गाणेच होते जास्त..एकवेळ मनात आले की एवढा काही हा सिनेमा चांगला नसावा….
अर्धा-पावून तास असाच गेलं थोडासा कंटाळवाणा…..जसा-जसा हा सिनेमा पुढे-पुढे सरकू लागला तसा-तसा त्यात इंटरेस्ट येऊ लागला..
मास्तरची/नायकाची अप्रतिम भूमिका करणारे डा.श्रीराम लागू(काही वर्षानंतर कळले की श्रीराम लागूंचा हा पहिलाच चित्रपट होता)अन् एक लावणी(नर्तकी)कलाकार म्हणून “संध्या” ही अभिनेत्री..ह्या कलाकारांचे नावसुद्धा माहित नव्हते अगोदर की बघितलेले पण नव्हते कधी .त्यातल्या त्यात फक्त निळू फुले तेवढे ओळखीचे कलाकार होते…बाकी सगळे अनोळखी..!!!
मास्तरांची भूमिका श्रीराम लागूनी एकदम व्यवस्थित ठसवली आहें.काही गोष्ठी नं बोलताही त्यांनी उत्तमरीत्या साकारल्या आहेत……त्यांचे चेहऱ्यावरचे भाव बरचशे काही सांगून जाते…
आणि संध्याची भूमिका काय म्हणावे…तिचा तो मास्तराचा बदला घ्यायचा म्हणून केलेला थयथयाट..हातात तुण-तुण घेऊन म्हटलेलं वाक्य……..
“नाही बोर्डावर तुण-तुण घेवून उभ केलं तर नावाची ………!!” त्या वाक्याबरोबर असणारे तिचे चेहऱ्यावरचे हाव-भाव,भुवया उंचावणे मुरका मारून तिथून निघून जाणे..अप्रतिमच!!!
ह्या पिक्चरमध्ये असणारे गाणे…”दिसला ग बाई दिसला…”,”आली ठुमकत नार लचकत..”,”मला लागली कुणाची उचकी..” अशी एकाहून एक अप्रतिम गाणे…… उत्कृष्ट नृत्यासाहित..!!
काय काय लिहू अन् कशाबद्दल लिहू..शब्दही कदाचित कमी पडतील…जगदीश खेबुडकरांची गीते, संध्याचे नृत्य,जेव्हा काही ही गाणे चालू असतं तेव्हा एकदम समोर खरा-खुरा तमाशा चालू आहें असेच वाटत होते.गावातली बरीचशी मंडळी एकदम शिट्या मारून ह्या गाण्याची मजा घेत होते.. गणपत पाटलाचं नाच्याचे कामही छानच होते..
नंतर ते मास्तरला तिच्या जाळ्यात ओढणे..मुलं शाळेत प्रार्थना म्हणत असताना शाळेत येऊन गाणे वैगरे म्हणणे…सगळं काही एकदम उत्तमरित्या सदर केले आहें दिग्दर्शकाने….आणि मग नंतर मास्तरला स्वत:च्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक …सगळं कसे एकदम सहजच घडते असं वाटत….मग पुढ त्या मास्तरचा तिच्याबरोबरचा तमाशातला प्रवास…
आणि मग खरच तुण-तुण घेवून बोर्डावर उभा राहिलेला मास्तर बघितला का मन एकदम हळव होऊन जात…आणि ते ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणे ऐकताना आणि पाहताना अगदी डोळ्यातून पाणी येत…ह्या गाण्यात पूर्ण चित्रपट आला आहें…..(ज्यांनी कोणी हा चित्रपट पाहिलेला नाही त्यांनी एवढे गाणे जरी बघितले तरी पूर्ण चित्रपट समजेल…पण पूर्ण चित्रपट बघण्यात जी मजा आहें ती काही वेगळीच ..:))
हे गाणे एकदम अप्रतिम लिहिलेले आहें जगदीश खेबुडकरांनी, त्यातल्या काही ओळी तर एकदम मनाला भिडून जातात….
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली!!
गंगेवाणी निर्मल असलेल्या,सगळी प्रजा सुखी असलेल्या गावात एक भोळा भाग्यवंत होता…’मास्तर’सगळ गाव त्यांना पुण्यवान म्हणत होते..अन् त्यांना मानतही होते…पण अश्या ह्या भोळ्या-भाग्यावंतस एका नर्तकीची द्रिष्ट लागली….तमाशा गावात आला तेव्हा मास्तरांच्या जीवाची घालमेल झाली, गावाची लोकं नाच-गाण्याच्या मागे लागून वेडे होतील, पोरं शाळा शिकणार नाही …अन् मग गावाचा विकास होणार नाही…म्हणून तमाशाला गावातून बाहेर काढून दिले पाहिजे असे वाटले..अन् मग गावाच्या भल्यासाठीच तमाशाला नदी पार करायला लावली…तमाशाची सावलीही गावावर पडायला नको म्हणून..!!!
पण तमाशातील नार सूड भावनेने पेटली होती, तिला ह्या मास्तराचा बदलाच घ्यायचा होता म्हणून तर तिने शपथ घेतली मास्तरला बोर्डावर तुण-तुण घेऊन उभ करण्याची..!! हेच सांगणाऱ्या पुढच्या ओळी..
सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेन, उभी पेटली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली!
पिसाळलेल्या नागिणीसारखी त्या नाचणीने थयथयाट केला,पण गावाची लोकं पुरती वेडी झाली होती तामाश्यामागे अन् नाच-गाण्यासाठी….लोकं आपला गावं सोडून तमाशा बघायला नदी पार करून जाऊ लागली……गावाच्या भलं बघणाऱ्या मास्तरांना हे खटकलं म्हणून त्या नाचनीला जाब विचारायला गेला, पण त्या नागिणीने घात केला,तिने डाव केला आणि भोळ्या मास्तरालाच तिच्या श्रुगाराच्या जाळ्यात ओढले.. …अशातच त्या नर्तकीची इज्जत वाचवता वाचवता अनवधानानं मास्तरांच्या हातून खून होतो….आणि तिथेच मास्तर पुरता फसतो…
खुळ्या जीव कळला नाही,खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली!
भोळ्या जीवाला तिचा डाव नाही कळला आणि तो पुरता फसून गेला,बिचाऱ्याला एकदम कुत्र्या-मांजराबरोबर जेवायला बसविले, हे बघताना मन मात्र एकदम खिन्न होतं…..
शेवटच्या चार ओळी तर अख्या आयुष्य समोर उभ करत…मास्तरांचं….स्वत:च्याच खुनाच्या गुन्ह्याखाली स्वत:ला अटक आणि मग फाशीची शिक्षा..,जिवंतपणीच आपला पुतळा गावात उभारलेला पाहून मास्तरची मान एकदम खाली जाते अन् साहजिकच मनात विचार आला असेल..”काय होतो मी अन् काय झालो मी? हे फक्त एका नर्तकीमुळेच..”
याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सारण
माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली!
शेवटी त्या नर्तकीला कळून चुकले होते की आपण एक भल्या माणसाला फसविले आहें,अन् माझ्यामुळेच एक भला माणूस फासावर चढतो आहें,म्हणून त्याला वाचवण्यासाठी ती मग सगळ खर-खर जगाला सांगायला जाते, पण तिथे पण नशिबाने डाव खेळला आणि तिची वाचा जाते…..आणि मग सगळं काही संपल म्हणून तीही प्राण सोडते..मग मास्तरलाही मग फाशीची शिक्षा होते,स्वत:च्याच खुनासाठी…!!
गाणे जास्त असल्यामुळे हा चित्रपट चांगला साडे-तीन चार तास चालतो आणि ह्या सगळ्यात वेळ कसा गेला कळलेच नाही.जेव्हा हा चित्रपट संपला तेव्हा जवळ-जवळ रात्रीचे २ वाजले होते..एक अप्रतिम चित्रपट पाहिल्यामुळे मनाला एक समाधान होते..आणि मग आम्ही असेच घरी निघालो..चित्रपट संपल्यानंतर कोणीही असे म्हटले नाही की हा चित्रपट चांगला नव्हता म्हणून…सगळे जन “लई भारीच्या”सुरातच होते..
फक्त चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा मनाला रुखरूख लागून जाते आणि त्या भोळ्या मास्तरची खरच कीव येते अन् ये सगळे एका नर्तकी मुळे झाले म्हणून वाईट वाटते..आणि दिग्दर्शकाने बाईच्या नादीच लागू नये हे एकदम उत्तम प्रकारे ठसवलं आहे ….!!
अप्रतिम कथानक,एक उत्तम रीतीने केलेले दिग्दर्शन, झकास गीते/संगीत आणि उत्कृष्ट अभिनय, ह्या सगळ्याचा जोरावर हा चित्रपट नेहमीच एक आवडता चित्रपट म्हणून आहें माझ्या मनात…आणि कायम राहीलही….!!!
एस.टी.महामंडळ अन् त्यांचे कर्मचारी…..
महाराष्ट्राचं एस टी महामंडळ म्हटलं की आपल्याल्या सगळ्यात पहिल्यांदा आठवत ते महामंडळाची लाल डब्बा बस……….लगेच आपल्याला तिचा तो अवतार डोळ्यासमोर येतो….पहिले म्हणजे तिचा रंग….बसला रंग द्यायला महामंडळाकडे पैसे नसतात(कारण शासनाकडून निधी मिळत नसावा कदाचित!!!)….अन् एखादी बस रंगवलेली असलीच तर ती फक्त शासनाच्या एखाद्या सामाजऊपयोगी जाहिरातीन असणार……म्हणजे..निसर्गाबद्दल जाहिरात असली तर सगळी बस निळी..त्यात सफेद रंगात झाडं काढलेली…..अन् त्यावर …”पाणी अडवा पाणी जिरवा” असा काहीतरी संदेश असणार…किंवा आरोग्यखात्याची जाहिरात असली तर..व्यसनाबद्दल असणार (रामरावांनी तंबाखू सोडली ..तुम्ही कधी सोडणार?..रामरावांचा चित्रासहित..)….किंवा कुटुंब नियोजनाबद्दल,भ्रूणहत्याबद्दल असणार वैगरे वैगरे………
अन् अश्या जाहिराती खूप प्रभावीही असतील असं मला वाटतं, कारण प्रवासी लोकं जेव्हा जेव्हा बस स्थानकावर असतात…तेव्हा तेव्हा त्यांना दुसरे कामच नसते…अश्या जाहिराती वाचण्याशिवाय(कमीत कमी जेवढे साक्षर लोकं आहें तेव्हढे लोकांना तरी)…
…..हा तर अश्या जाहिराती असलेल्या बस असो ..किंवा फक्त लाल रंग दिलेल्या बस असो…त्या बस वर साचलेली धूळ म्हणजे रस्त्यांनी बसला दिलेली एक प्रकारची देणगीच….तशी प्रत्येक वाहनाला धूळ हे भेटतेच…फक्त आपल्या महामंडळाला बस पुसायला किंवा पाण्याने धुवायला वेळ नसतो, अन् अजून बसच्या खिडकीच्या काचा पण एकतर पूर्ण काळ्या पडलेल्या असतात…किंवा तुटलेल्या तरी असतात..तर अशा ह्या बसला रस्त्यावरचे खड्डे कायम सोबतीला असतात…….म्हणून आपली एस.टी. बस ..एकदम खटारा बस..होऊन जाते……..त्या बस मध्ये बसले की एखाद्या हेलीकॉप्टर मध्ये बसल्यासारखे वाटते….तिचा तो खड-खड आवाज, बसच्या ब्रेकचे कर कर आवाज.!!!! बस वर लावलेली पाटी पण १८५७ च्या काळातली असल्यासारखी….पाटीवर लिहीलेल गावाचे/शहराचे नाव वाचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते…ही अवस्था आहे गावातल्या किंवा तालुका स्तरावर असणाऱ्या बसेसची..नाही म्हणायला शहरातल्या बसेस किंवा लांब पल्ल्याच्या, जिल्हा स्तरावर असणाऱ्या बसेस तश्या व्यवस्थित असतात….
बर असो….मी जास्त नाही लिहिणार ह्या गोष्टीवर…लिहिणार आहें ते फक्त महामंडळातील कर्मचारी माणसांचा….
……….हा तर आपण कधी विचार केला आहें का महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा …तिथले चालक(ड्रायव्हर)…वाहक(कंडक्टर)….बाकीचे कर्मचारी आपल्याला कधी माहित होत नाही …..अन् झाले तरी फक्त थोड्या लोकांना….अन् ज्यांना पण माहित होत असतील त्यांना
पण त्यांच्या पदाचे नाव सांगता येणार नाही…
म्हणजे…
१. चौकशी अधिकारी :- डेपोमध्ये असणारे …सर्व बस गाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती देणारे एक(आपल्याला कधी बसच्या चौकशीची गरज पडली तर…? ते कायम पाहिले वेळापत्रकाकडे बोट दाखवणारे..) डेपोमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे हिशेब ठेवणारे(ह्यांच्याशी आपला कधी संबध येत नाही..)
२. ……पासचे फॉर्म वैगरे भरून घेणारे क्लार्क (ज्या लोकांना पासची गरज असते ..अश्या लोकांचीच ह्यांचाशी गाठ पडते…).. ..
३. पास मंजूर करून देणारे………..आगार व्यवस्थापक…..वैगरे..वैगरे…
अशीच बरीचशी मंडळी असतात आपला प्रवास सुखाचा करण्यसाठी धडपडत असतात……..पण अश्या मंडळीमध्ये आपला ज्यांच्याशी जास्त संबंध येतो ते म्हण्जे…ड्रायव्हर अन् कंडक्टर…..बाकी लोकांचा आपण कधी विचारही करत नाही अन् इथेपण करणार नाही……….मी बऱ्याच वेळा संगमेंर पुणे,पुणे-संगमनेर प्रवास करत असतो…कारण माझ मूळ गाव संगमनेर आणि पुण्याला मी नोकरी करतो….तर माझा प्रवास नेहमी लाल डब्ब्यातूनच…तर अश्याच एके दिवशी सकाळी सकाळी मी संगमनेर बस स्थानकावर आलो…पुण्याची बस पकडण्यासाठी…….नेहमीप्रमाणे नाशिक-संगमनेर-पुणे, नगर-संगमनेर-पुणे,शिर्डी-संगमनेर-पुणे अश्या बाराचाश्या गाड्या संगमनेर वरून जातात…..म्हणून पुण्याला यायला मला बस लगेच भेटतात. ……अश्याच दिवशी, सुट्टीचे दिवस असल्यामुळे सर्व बसेसला गर्दी होती… जेवढ्या बस येत होत्या त्या सर्व गच्च भरून येत होत्या वाटलं २-४ बसेस अश्याच जाऊन दिल्या…पण जसा–जसा दिवस पुढे चालला होता…कोणतीतरी गाडी थोडी रिकामी येईल असं वाटत होत पण तसा काही नव्हते होत. मला उभे राहूनच जावे लागेल…असं वाटत होतं..अशीच ४०-४५ मिनिट गेली…बस तर काही रिकाम्या येत नव्हत्या….शेवटी ठरवलं आता जी बस येईल त्यात चढायचे…आणि उभे राहून जावे लागले तरी जायचे म्हणून….थोड्याच वेळात इगतपुरी-अकोले-संगमनेर-पुणे बस आली ती पण पूर्ण भारालेली होती…तरी गर्दीतून वाट काढत मी बस मध्ये चढलो..आणि पूर्ण बसमध्ये जरा नजर टाकली…कुठे काही जागा भेटते का म्हणून….? पण नाही कुठेच काही नाही….आणि मग मनाची पक्की तयारी केली की चार तास उभा राहून जाऊ म्हणू…मग काय मनाची तयारी झाल्यानंतर मग गर्दीचे पण काही वाटले नाही……असाच जागा शोधत-शोधत ड्रायव्हरच्या केबिनकडे लक्ष गेल तर तिथे कोणीच बसलेले नव्हते म्हटलं चला आज तिथे बसू..आणि मग ड्रायव्हरची परवानगी घेवून त्यांच्या शेजारीच बसलो….इंजिनच्या बॉक्सवर….मनाला एक समाधान वाटले की आज एका एस.टी.चालकाचे जीवन कसे असते ते तरी समजेल म्हणून…..कसे वाटते एवढे मोठे अवजड वाहन चालवण..अन् एवढ्या प्रवाश्यांना घेवून जाणे..जरी मी बस चालवणार नव्हतो तरी बस चालवण्याच्या मनस्थितीत गेलो होतो…एक ४५-५०च्या वयात असलेला माणूस…केस निम्मे सफेद झालेले ..गांधी टोपी घातलेली…माध्यम अंगकाठी…..दात थोडे लालसर पडलेले…कदाचित तंबाखू खाऊन..( सगळीकडे प्रसिद्ध असलेली गाय-छाप..तंबाखू……..मी तंबाखू त्याना मळताना बघितले होते..त्यांच्या पुडीवरचे नाव.)अशीच बोलता–बोलता त्या ड्रायव्हारची ओळख करून घेतली….तर ते इगतपुरीमध्ये राहायला आहे..त्यांची बस ही इगतपुरी आगाराचीच आहें….
“किती वाजता निघाली बस इगतपुरीमधून काका?” मी असच विचारलं.
“सकाळी ५ वाजता” चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न ठेवता त्यांचे उत्तर….
“मग किती वाजता पोहचेल पुण्यात…अन् तिकडनं परत कधी येणार…?” मी मोठ्या उत्सुकतेने विचारले…
“पोहचते…१-२ ला…तसा वेळ आहें बसचा दुपारी पावणे-एक चा वाजता पुण्यात पोहचण्याचा, पण हे ट्राफिक इतकं असतं की दीड वाजून जातात शिवाजीनगर मध्ये पोहचता–पोहचता……. आणि दीड वाजता परत फिरण्याचा वेळ आहे ह्या बसचा…” ड्रायव्हरकाका..
“अन् मग १:३० निघाल्यावर किती वाजता पोहचणार?”
“९:४५ची वेळ आहें इगतपुरीमध्ये पोहचण्याची.. पण १०:३० -११ रा होतात… “ आता थोडासा वैतागलेला चेहरा करत…..आणि हे रोजचेच असते…
“हे असं आसत बघ…एकवेळ हाय-वे ला बस चालवण सोप्प…पण असं शहरात असं कोणीही मध्ये रस्त्यात आडवे होत्यात…बघ ते शिंगरू अजून मिसरूडही नाही फुटलं तेच मोटर-सायकल चालवताय….” बसला आडवा गेलेल्या त्या मोटार-सायकलवाल्याला उद्देशून..अन् थोडाश्या वैतागलेली भावमुद्रा करून..
मी मनातल्या मनात गणित मांडत होतो किती काम करता म्हणून..हे लोकं…आणि मी ड्रायव्हरशेजारी बसलेलो असल्याने मला पुढे किती ट्राफिक असते ते समजायला वेळ नव्हता लागत…असच एक एक करत आमची बस आता नारायणगाव बस स्थानकावर आली होती…आणि प्रत्येक शहरात ट्राफिक असतेच..मोटोर-सायकल वाले…कुठे मध्ये रस्त्यात आडवे येतात…रिक्षावाले मधेच घुसत असतात.आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखा..तर छोट्या गाड्या (कार,जीप वैगरे)…मधेच एस.टी. ला आडवे जातात.अन् एवढी लांब असणारी बस एवढ्या गर्दीतून काढायची म्हणजे मोठी कसरतच आहें अस मी समजतो…अन् हे रोजच करायचे आहें …आणि रोज काही रस्त्यावर अपघात होताच असतात..मग त्यामुळेही ट्राफिक जाम होताच राहते…. अन् अजूनही प्रवासी लोकं जिथे म्हणतील तिथे बस थांबवावी लागते…म्हणजे जिथे घंटी वाजेल तिथे बस थांबवायची…….
“मग तुम्हाला ह्या ट्राफिक चा वैताग येत नाही का काका? “मी आपल उत्सुकतेपोटी विचारलं…
“येतो…ना. कसा नाही येणार ..पण करणार काय..रोजचेच आहे ..हे ..अन् पोटापाण्यासाठी कष्ट तर करावेच लागणार….अन् तुला सांगु का पोरा ह्या सगळ्याची सवय झाली आहें आता…काही वाटत नाही आता..”
त्यांचं बोलणं ऐकता ऐकता माझ्या मनात दुसरेच विचार चालू होते… साधा आपण एक दिवस एखादा तास पुण्यासारख्या शहरातून प्रवास केला तर किती वैताग येतो..आणि अगदी थकल्यासारख वाटत…..आपण आपला एकदम संयम नसल्यासारख याला-त्याला शिव्या देत असतो…अन् इथे ही लोकं रोज त्यांची काम नित्यनियमाने करतात….अन् त्यांचा संयम किती असतो बघा…मी बऱ्याच वेळा बस मध्ये असताना..बसमधील प्रवाशी लोकं बस-ड्रायव्हरला उगाचच शिव्या द्यायचं काम करता, म्हणजे ..”ह्याला नीट गाडी चालवता येत नाही का? किती हळू-हळू गाडी चालवतोय वैगरे.. वैगरे”…पण आज मला इथे ड्रायव्हरशेजारी बसल्यानंतर कळले की रस्त्यावरचे सारीच लोकं ही शिस्तीत नाही चालत….कोण कधी आडव येईल ह्याचा भरवसा नाहीये….म्हणून तर मला ही कर्मचारी मांडली खूप संयमी असतात असं वाटत….
अन् तसे बघितले तर त्यांना जास्त पगार पण नाही भेटत…फक्त त्यांना इतर भत्ते भेटतात म्हणून बरे आहें त्यांचे ….अन् त्यांना जास्त सुट्टी पण नाही भेटत…कारण जेव्हा-जेव्हा काही सणा-सुदीचे दिवस असतात …तेव्हा –तेव्हा एस.टी महामंडळ बसेसची संख्या वाढवते..आणि मग साहजिकच ह्या लोकांना सुट्टी नाही भेटत…..हे लोकं आपली वैयक्तिक जीवन कस सांभाळता कोणास ठाऊक….जी स्थिती चालकाची तीच वाहकाची…तरीपण ह्या लोकांचे कष्टाचे मला अप्रूप वाटते…आणि त्यांच्या जीगरीबद्द्ल नवल वाटत….आणि ही लोकं करत असलेल्या कष्टाला सलाम करत….इथे लिहिण्याचे थांबवतो….!!!
वेड्या माउलीची वेडी माया!!!
आज दिवसभर सारखा पाऊस पडत होता वादळ-वाऱ्यासहित..एका उंच झाडाच्या शेंड्यावर एक छोटासं घरट असलेल्या त्या पाखराला चिंता लागून राहिली होती,आज माझ्या पिल्लांना दाणा-पाणी कसा करायचा..????पाऊस इतका जोरात होता की .घरट सोडलं तर आपली पिल्लं रस्त्यावर येतील ..अन् एवढ्या वादळ वाऱ्यात ती जगतील की नाही ती हि शंकाच..?म्हणून त्या माउलीची चिंता वाढतच होती..अन् देवाकडे एकच प्रार्थना करत होती तासाभाराकरतातरी पाऊस उघडू डे ..अन् माझ्या पिल्लांना चार घास तोंडात घालू दे …तिचे पिल्लं मात्र तिच्या कुशीत निवांत झोपलेली होती….
अचानक जोरासा वारा आला अन् सारं झाड इकडचे तिकडे झाले..क्षणभर त्या माउलीचा काळजाचा ठोकाच चुकला …वाटल आपल सारं घरट खाली पडलं की काय असं वाटलं ..पिल्लांसहित..?
दुसऱ्याच क्षणात पिल्लांकडे अन् घरट्याकडे लक्ष गेलं तर सगळ काही ठीक होतं ..तिने अजून घट्ट आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतल…झाडाच्या हलण्याने पिल्लांना जाग आली..
कदाचित पिल्लानाही त्यांच्या आईची तगमग समजली असावी..वरतून आख्खां पाऊस झेलणारी ती माय पिल्लांना एक थेंबही लागू देत नव्हती…
असाच काही वेळ गेला अन् पाऊस उघडला,देवानं त्या वेड्या माउलीची विनवणी ऐकली असावी….त्या माउलीला थोडं बर वाटल होतं..वातावरण एकदम शांत झाल होतं.हवेत गारवा होता ..त्या माउलीला वाटलं आता आपण घरट्याबाहेर पडायलाच हव…ती निघणार तेच तीच एक पिल्लू कळवळून बोललं.
“आई नको न जाऊ आमच्यापासून असं दूर असं,तुझ्या कुशीत सार काही विसरून जातो आम्ही ….एवढ्या जोर-जोरात वादळ-वारायासहित पडणारा पावसात तू आम्हला एक थेंबही लागू दिला नाही की साधी इजाही होऊ दिली नाही…साऱ्या-साऱ्या वेदना, दुख,संकट तू आपल्या अंगावर झेलली…तू नसती तर आज आम्ही कुठेच नसतो…..कुठून एवढ बळ मिळवलस, आई तू?”
“कळेल, कळेल तुम्हाला हे सगळ जेव्हा तुम्ही मोठे झाल्यावर…” असं म्हणत तिच्या डोळ्यातून कधी दोन थेंब खाली पडले तिलाही कळले नाही…
स्वत:ला सावरतच ती म्हणली…
“आले मी….लवकरच….” अस म्हणत ती भुरकन घरटयाबाहेर पडली अन् १०-१५ मिनिटात जे काही अळ्या-किडे मिळतील ते ते तिने वेचले अन् ..भराभरा पिल्लांच्या चोचीत टाकू लागली..
पाऊस पुन्हा गर्जत होता…तिला शंका होती..पाऊस परत येण्याची……एक -एक करत तिने साऱ्या पिल्लांच पोट भरल….
अन् पुन्हा घरट्यात आली….पाऊसाची रिप-रिप परत चालू झाली होती…तिला आता मात्र घरट्यातच थांबवा लागणार होतं….मनाला तिच्या एक समाधान होतं .आपल्या पिल्लांच पोट भरल्याचा…तिच्या पोटात मात्र अन्नाचा एक कणही नसताना……..!!
असाच मग दिवस गेला ..पावसातच..अन् आता रात्रही झाली होती…तरी पाऊस काही उघडत नव्हता….ती बिचारी माउली मात्र उपाशीच होती..तशीच रात्र जागून काढत ……तरीही तिला काही वाटत नव्हत…मनात एक प्रकारचे समाधानच होते…आपल्या कुशीत पोरं निवांत झोपलेली पाहून…तिची भूक कुठच्या -कुठे पळाली होती…..!!!!!.
ह्या वेड्या पाखरासाराखीच आपल्या सगळ्यांची माउली असते असं मला वाटत….स्व:त उपाशी राहील पण आपल्या लेकरांना कधी उपाशी नाही ठेवणार… म्हणूनच माझी सगळ्यांना विनंती आहें की काहीही झाले तर आपल्या आई-वडिलांचे उपकार विसरू नका…आणि तिला शेवटी काय अपेक्षा असणार ..आपली लेकर सगळी मोठी व्हावी अन् साऱ्या जगाला गवसणी घालावी..सार जग जिंकाव…..म्हणून म्हणतो आपल्या आईला कधीही दुखवू नका …एवढीच एक अपेक्षा…..!!