Archive for मार्च, 2011
देवा तुलाही हक्क आहे ..!!
एक माणूस म्हणून आज कुठेतरी देवाच्या भक्तीत आपण कमी पडतो आहे असे वाटतयं..कारण माणसावर संकटं, दुःख आली का मगच देवाचा धावा करायचा ही प्रवृत्ती वाढत चालली आहे ..मग अभिषेक, पूजा,महापूजा, शांती करणे इत्यादी अनेक कार्यक्रम केले जातात .. मग तिथे पाहिजे तेवढा पैसा पण ओतला जातो..पण रोक काही वेळा देवासाठी,देवाची भक्ती करण्यासाठी माणसाला वेळ नाहीये…..
जेव्हा देव,निसर्ग आपल्याला भरभरून देतो तेव्हा आपण देवाचे क्षणभर आभारही मानत नाही का,पण रोज १५-२० मिनिटे वेळ देवासाठी द्यायला पण वेळ मिळत नाही …मिळत नाही म्हणण्यापेक्षा वेळ काढला जात नाही ……ह्यामुळेच जगात भूकंप,पूर,दुष्काळ,त्सुनामी वगैरे ही संकट येतात..ती कदाचित ह्याचीच फळ असावीत ….म्हणूनच मला वाटत की देवाला हक्क आहे त्रास देण्याचा, दु:ख देण्याचा…हेच काहीतरी शब्दात मांडण्याचा प्रयत्न..!!!
देवा तुलाही हक्क आहे
थोडसं रडवण्याचं…
कारण जेव्हा मी ह्या जगात येतो,
जेव्हा मी दिवसभर खेळत असतो
मस्ती करत असतो..हसत असतो…..
मी ह्या जगात आलो ते फक्त तुझ्या तुझ्या कृपेने हेही मला माहित नसतं..
– एक बाळ
देवा तुलाही हक्क आहे
चालत्या गाडीला बंद पाडण्याचा..
कारण हीच गाडी जेव्हा धावत असते तुझ्या कृपेने..
तेव्हा नाही मानत मी तुझे आभार.
–एक वाहनचालक
देवा तुलाही हक्क आहे
दिवसभर उन्हा-तान्हात वाट चालणारा मी
मला मग तहानेने व्याकुळ करण्याचा…
कारण त्याशिवाय तर मला “पाणी जीवन आहे ” ह्याचा अर्थ कळत नाही
-एक वाटसरू
देवा तुलाही हक्क आहे
कधी-कधी आम्हाला नापास करण्याचा
कारण वर्षभर तू आम्हाला माहीत नसतो
माहित होतो ते फक्त परीक्षेच्या वेळेसच..
-एक विद्यार्थी
देवा तुलाही हाक आहे
कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पाडण्याचा
कारण तू जेव्हा भरभरून देतो आम्हाला,
तेव्हा आम्ही क़्वचितच देवळात येऊन तुला नारळ फोडतो..
-एक शेतकरी
देवा तुलाही हक्क आहे
जेव्हा सुट्टी पाहिजे असते,
तेव्हा ती न मिळवून देण्याचा
कारण जेव्हा आम्हाला सुट्टी असते
तेव्हा आम्ही सिनेमाला जाण्याला पहिली पसंती देतो
मंदिरात जायला आम्हाला वेळ नसतो.
-एक नोकर
देवा तुझाही हक्क आहे
कधी-कधी माझी अन् तिची भेट न होऊ देण्याचा..
कारण आम्ही दोघं जेव्हा भेटतो तेव्हा आम्हाला सारं जग विसरायला होतं..
अगदी तुला सुद्धा..
-एक प्रेमी
देवा तुलाही हक्क आहे
आख्खा समुद्र पालथा घालूनही
एकही मासा न मिळून देण्याचा
कारण जेव्हा टोपलं भरून मासे मिळतात तेव्हा
मी क्वचितच असं म्हणतो देवा हे फक्त तुझ्यामुळेच
-एक मासेमारी करणारा
देवा तुझाही हक्क आहे
म्हातारपणी नको ते आजार देण्याचा,
कारण आयुष्यभर जनतेच्या सेवेच्या नावाखाली,
जनतेचेचं पैसे खिशात टाकले,अन् जनतेलाच लुबाडण्याचे काम केले,
तेव्हा नाही भीती वाटली आम्हाला तुझी..
-एक भ्रष्ट राजकारणी
देवा तुझाही हक्क आहे
आयुष्यात दु:ख देण्याचा ,संकट देण्याचा
कारण हीच दु:ख, संकटं आम्हाला बळ देतात
जगण्याला ..अन् जगाला गवसणी घालायला..
अन् देवा हा तुझाच हक्क आहे
जीवन हे जगता-जगता कोणत्या क्षणी संपवायचं….!!!
-एक माणूस
जगणं डोंगरांच !!!
जळती डोंगरं बघितली का माझं मन अगदी भकास होऊन जातं..सताड डोळ्यांन वरती देवाकड बघत असल्यासारखं ……ह्याचं रूप!!!!
दरवर्षी उन्हाळ्याचे दिवस लागले की डोंगरांचं जगणं बघितलं की मन मन उदास होऊन जातं….कुठे पेटवून दिलेली डोंगर तर कुठे आपो-आपोआपच उन्हानं भाजलेली डोंगर….लहानपणी दूर कुठेतरी संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला की,डोंगरावर लाल-भडक जाळ दिसला की डोंगराला आग लागली असं वाटायचं..पण नंतर कळायला लागली की आग लागत नसे,ती लावली जायची…..डोंगरावरचं सारं वाळलेले गवत,पाला-पाचोळा,काटे-कुटे जाळून टाकायची…….चैत्राचा महिन्यात जिथे नुकतीच पालवी फुटलेली झाडं आहेत ती पण ह्या आगीत होरपळून निघणारी….
पावसाळ्यात ह्याच डोंगराचं रुपडं बघितलं का मन कसा हरखून जातं..
….सारा डोंगर परत हिरवागार……….सगळी प्राणी,पाखरं,फुलपाखरं,मनसोक्त जीवन जगणार….फुलपाखरं आनंदान ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला तयार…..पाखर आपापली घरट बांधून पिल्लं वाढवणार……शेतकऱ्यांचे जनावराची डोंगरावरच्या गवताना पोटं फुगणार……. अख्खा पावसाळा हा डोंगर कसा हिरवागार झाडा-झुडपांनी सजलेला….खारुताई इकडून तिकडे उड्या मारणार…लहान लहान किडे,मुंग्या-मुंगळे आपला निवारा करणार..मोरांचे नाचणं पावसाच्या सरीवर पडताना…..धो-धो वाहणारे धबधबे…..पावसाच्या पाण्याला वाट करून देणारं डोंगर…..वाटलंच तर स्वतःला खाच-खळगे करून घेण…सगळ काही भरभरून देणारा..आपल्याजवळ असणार सगळ देणारा..अगदी किड्या-मुंगीपासून अगदी माणूस प्राण्यापर्यंत सगळ्यांना भरभरून देणारा…….अश्या वेळी मनाला प्रश्न पडतो….एवढ्या डोंगराळ,खडकात कुठून एवढा गवत-गबाळाच बी पडतं कुणास ठाऊक……सगळी जमात कशी आनंदानं जगतात……..अगदी ६-७ महिन्याचेच जगणं म्हणाव ह्या डोंगरांच …पावसाळ्याचे ३-४ महिने अन् हिवाळ्याचे २-३ महिने……पण ह्या ६-७ महिन्यातच भरभरून देण ….बाकी उन्हाळा लागला की मग मात्र हीचं डोंगर जाळली जातात, नाहीतर उन्हानं अंगाची लाही लाही होऊन पुरती भाजून तरी जातात…….आतापर्यंत अंग-खांद्यावर नाचणारी पक्षी, बागडणारे फुलपाखर, डोंगराच्या खुशीत येऊ राहणारी नाना-तऱ्हेचे किडे,मुंगळे अन् मुंग्या कुठतरी हरवून जातात, पाखरांनी केलेली घरट रिकामी, ओस पडलेली…त्यांची पिल्लंही उडून गेलेली……….झाडही एकतर करपून गेलेली नाहीतर जाळून खाक झालेली…दरवर्षीचेच हे जीणं डोंगरांचं………..!!!
साऱ्या जगाला एक जगणं शिकवणारे ह्या डोंगराचं जगणं…..
जीवन जगायचं असतं सुख-दुःखाचं गणित ध्यानात ठेवूनच
जसा पावसाळा आहे ..म्हणजे सुखचं सुख आहे…
तसं दुखही आहेच..जसा उन्हाळा आहे..
उन्हाळा असतो ते आपल्याला कणखर बनवण्यासाठी….
आलेल्या संकटाना सामोरं जाण्यासाठी…
वेळ आली तर उनही झेलायचं असतं …..थोडा धीर धरायचा असतो..
कारण उन्हाळा हा आपल्याला कायम सोबत करणार नाही..त्यालाही त्याचे आयुष्य आहे…!!!!
अन् पावसाळा असतो ते भरभरून आनंद लुटण्यासाठी..ऊत-मात न करता,
अन् भरभरून आनंद देण्यासाठी……
आपल्या परीने जेवढा आनंद जगाला देता येईल तेवढा देणं..कारण पावसाळाही चिरंतर टिकणारा नसतो…
अन् त्यालाच कदाचित सुख म्हणत असाव………!!!