असेच अनुभवलेले…….थोडसे विचार करायला लावणारे…….!!!

फेब्रुवारी 4, 2011 at 11:09 pm 5 comments

आपल्या जीवनात रोज कोणी न कोणी भेटत असतं.. ……कोणी ओळखीचे …तर कोणी अनोळखीचे…….जे ओळखीचे असतात ते आपल्याला जीवनात ह्या ना त्या मार्गाने प्रभाव पडताच असतात…..पण जे अनोळखीचे असतात ते पण आपल्याला जीवनात काहीतरी शिकवून जातात तर कधी कधी असाच उगाच विचार करायला भाग पाडतात….असाच माझा एक अनुभव इथे मांडतोय….

९-१० दिवसापूर्वी पुण्याकडे येत होतो….संगमनेरहून….नेहमीप्रमाणे एक बस पकडली …आपला लाल डब्बा….जेव्हा बस मध्ये बसलो तेव्हा एक उगाचच एक वेगळी जाणीव व्हायला लागली ………….बसही थोडी रंगीबेरंगीच होती…बसच्या खिडक्यांच्या काचेवर लिहिलेले ..ते “जय भवानी जय शिवाजी..” ” जय महाराष्ट्र……”चे शब्द… एकदम महाराष्ट्र अभिमान जागवत असल्यासारखी वाटणारी…कोपरगाव आगाराची बस होती ती…..तर असो…

माझ्या मुख्य पात्राकडे वळतो…बस कंडक्टर..दाढी वाढवलेला……सावळा रंग असलेला…कपाळाला टीळा लावलेला….उंची चांगली ६ फूटच्या जवळपास…शरीरयष्टी एकदम कडक……. तडफदार आवाज…(ते पुढे समजेलच तुम्हाला)…………

प्रवाशी लोक जोपर्यंत खिशातून पैसे काढत आहे तोपर्यंत हा माणूस आपला त्या प्रवाश्याकडे पाहत राहणार………हाताची घडी घातलेली ..मागच्या सीटला टेकुन….आपली दाढी हळूच कुरवाळत…..एक गुढ नजरेने बघणे…अन जेव्हा लोक २०-२५ रु.च्या तीकीटासाठी १००-५०० च्या नोटा काढायचे तेव्हा मात्र हा माणूस एकदम तडतड करायचा……….

“कोणाकोणाला सुट्टे पैसे देऊ…….?? सुट्टे पैसे द्यायला काय होते तुम्हाला….माझ्याकडे काय बँक आहे का सुट्टे पैश्यांची वैगरे वैगरे…असं बरेच काही …तरीही प्रवाशी लोक मुकाट्याने त्याचे बोल ऐकून घ्यायचे …….कोणी काही बोलत नसे..कारण त्यांना बहुतेक माहित असावे की हा माणूस कुठून न कुठून सुट्टे पैसे देतील म्हणून……..!!!

मी अगदी बसच्या एकदम शेवटून दुसऱ्या-तिसऱ्या सीटवर बसलेलो होतो…….मला ह्या माणसाचे जरा कुतूहल वाटले म्हणून मी आपल्या कुतूहलापोटी त्याच्या प्रत्येक हालचालीवर/बोलण्यावर बारीक लक्ष ठेवून होतो….माझ्यापर्यंत तिकीट काढायला येईपर्यत……

“शिवाजीनगर एक ” मी आपले एकदम जेवढे तिकिटाचे पैसे आहेत तेव्हढे पैसे अगदी सुट्ट्या पैश्यासाहित त्या माणसाच्या हातात दिले…

“ओन्ली वन….!!!फक्त एकाच तिकीट आहे पुण्याचं….आख्या बसमध्ये…बाकी हे सगळे आधले -मधले…..” आपल्या हाताने एक आकड्याची खून करून दाखवत तो एवढ्या मोठ्या आवाजात बोलला कि साऱ्या बस मध्ये आवाज घुमला………

मी असेच थोडे स्मितहास्य केले अन क्षणभर मला मी जसा काही विशेष माणूस आहे असं वाटले….ते थोड्यावेळापुरतेच कारण माझ्या मागे बसलेल्या अजून एका प्रवाश्याने पुण्याचे तिकीट काढले होते……..ते अमराठी असावेत कारण कंडक्टर त्याच्याशी आपले तोडक्या मोडक्या हिंदीत बोलत होते… बर असो..

ह्या कंडक्टरचे  सगळ बोलणं आणि सारा अवतार बघून माझ्या शेजारचा एक प्रवाशी म्हटला सुद्धा कि ह्याला येरवड्याला न्यायची गरज आहे म्हणून…!! मी मात्र त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही दिले आणि फक्त ह्या साऱ्या गोष्टीचा आनंद घेत होतो….आलेला क्षण अनुभवायचा……!!

असाच तास -दीड तास झाला……….प्रवाशी चढ-उतार करतच होते…मी आपला ह्या माणसाचे निरीक्षण करतच होतो….

पुढे आल्यानंतर हायवे वर एक अपघात झालेला होता…एक कंटेनर आणि एका तवेरा गाडीची जोरात धडक झालेली होती….त्या तवेरा गाडीचा पूर्ण चुराडा झाला होता…..

“ये देखो इंडिया शायनिंग….” आमचे मुख्य पात्र (कंडक्टर) माझ्या मागे बसलेल्या अमराठी प्रवाश्याशी बोलत होते…हिंदीत…एकदम उच्च आवाजात…!!

“ये शायानिग इंडिया बोलते है…..अपने नेता लोग….और ये देखो कैसे होता है….!!!”   त्या झालेल्या अपघाताकडे हात करत ते बोलतच होते…

“हा ना……कायका शायनिंग…!”      ते प्रवाशी पण ह्यांना चांगला प्रतिसाद देत होते….मी मात्र आता त्यांच्याकडे आता काय बोलणार म्हणून कान-डोळे दोन्हीपण त्यांच्याकडे रोखून होतो…..

“बहुत अवघड है सब……” ते पुढे बोलतच होते….आपली मराठी हिंदीत कधी घुसडली जाते तेच काही कळत नाही मराठी माणसाला… अन् त्याशिवाय आपण हिंदी बोललो ह्याच समाधान पण वाटत नाही….मराठी माणसाला…असं मला वाटत…

“देखो तुमको बोलता हूँ … ..बहुत अवघड है…..तुमको मालूम नही होगा यहाँ रंजनगाव (रांजणगाव..म्हणायचे असावे बहुतेक पण हिंदी बोलत होते म्हणून..) बहुत अच्छी एकदम फर्स्ट क्लास एमआयडीसी बनी है…”

” हा हा….. पता है………….. ”  त्या प्रवाश्याचा दुजोरा…..त्या प्रवाश्याच बोलण् मध्येच तोडत..

“अब वहा के लोगो ने क्या किया उनकी जमीन थी ….अच्छे पैसे मिले..बेच डाली……तो जब पैसा हात में आया तो ..फिर शायनिंग मारते रहे….अच्छे अच्छे हाटेल में खाना खायेंगे ..भारी-भारी गाडी लेंगे…शायनिंग मारेंगे…….और  अब वही लोग वहा पे वाचमन का काम करते है….बहुत अवघड है…….और ये सब जगह होनेवाला है…..सब लोग भिकारी बनेंगे…देखना तुम…..!!!  त्यांचा पट्टा चालूच होता…इतका जोरात आणि फास्ट कि मला एकदम प्रहार मधला नाना पाटेकरच आठवला…..आणि आपली सगळी चीड तो इतका जोर-जोरात सांगत होता कि सारी बस सुन्न झाली होती….. …………

“सही बात है…” तो अमराठी माणूस….

पण हे जे काही हा माणूस बोलला ते मला एकदम मनाला पटलं …….आताच्या जगात लोक फक्त पैशाची उधळपट्टी करतायेत….पुढचा विचार कोणी नही करत……..फक्त मौज-मज्जा करायची……..फक्त पैसा पाहिजे लोकांना…ना पर्यावरणाचा विचार करायचा की अगदी माणसांचा पण नाही की माणुसकीचा सुद्धा नाही….

बस पुढे चालूच होती….नारायणगावामधून १०-१२ प्रवासी चढले…त्या कंडक्टरची तीच स्टाईल ….लोकांकडे बघणे…….सुट्टे पैसे नही दिले तर तणतण   करणे….पण तरीही कोहीही प्रवाशी त्यांच्याशी हुज्जत घालत नही बसले…हे विशेष…

एक २५-२६तला तरुण…. .नारायणगावामधून बसलेला…तिकीट काढायच्या वेळेस १०० ची नोट काढली….आमचे हिरो आता एकदम तापले….

“भाऊ..दोन पन्नास नाहीयेत का?”  कंडक्टर

“नाही ना…असते तर दिले असते..” तो तरुण..अगदी सौम्य आवाजात.

” मग कसं तिकीट काढायचं ..सगळे इथे १००-५०० च्या नोटा काढतायेत…कोणाकोणाला…………” त्यांचा तो पट्टा चालू झाला….                                                                                                                                                                                    “देतो ना..बस मध्ये कोणाकडे तरी  सुट्टे बघून देतो….” तो तरुण…

“अरे देतो ….करतो…..असं म्हणणारे खूप आहेत…आश्वासन देऊ नका….पुढाऱ्यासारखे.” असं म्हटल्याबरोबर  आम्ही चार-पाचजण हसू लागलो..ते मात्र अगदी रागातच होते…त्यांचा तो रोष आता कदाचित राजकारण्याकडे होता…….. आपल्या नेते मंडळीवर असलेला राग इथे आग ओकत असल्यासारखे बोलत होते…..

” बोलण सोपं असत….. करण  अवघड असत…..समजलं का? ” त्यांचा पट्टा चालूच होता…

“नाही नाही खरेच देतो….” तो तरुण प्रवासी असं म्हटल्यावर त्यांनी असेच वाकडा-तिकडा चेहरा करून तिकीट फाडले…मी मात्र ह्या गोष्टींचा विचार करत होतो की अशी माणस राजकारणात का नाहीये………आपला भारत तरी आजच्या भ्रष्टाचारापासून वाचला असता…..

तेवढ्यात तो तरुण आम्हाला म्हणाला की हा कंडक्टर जे काही बोलतो ना….त्याचा मला कधीच राग येत नाही ….मी बऱ्याच वेळा  ह्या बस मध्ये जातो….वेळ कसा निघून जातो कळतच नाही..आणि खरच त्यांच्या बोलण्याचा कधीच राग येत नाही..कारण मला माहितेय आतापर्यंत त्याच्याशी कोणीही हुज्जत नाही घातली……….त्याचा प्रवाश्यांशी बोलताना असलेला राग हा फक्त वर –वरचा असेल कदाचित म्हणूनही असेल….

एक ५०-६० च्या वयातली महिला प्रवाशी……लुगड घातलेली….तिलाही पुण्यात जायचे होते…म्हणून तिने १००ची नोट काढली..

“मावशी ..पाच-दहा-पन्नास काही सुट्टे आहेत का..? ” कंडक्टर महाशय त्या महिलेला विचारताय…

“नाही ना ..भाऊ…” ती महिला

“दोन रुपये….चार रुपये…काही सुट्टे ?”     ते

“नाही..”  ती

“मग किती आहे.?”  ते महाशय थोड्या रागातच….

“पाचशेची नोट आहे……देऊ का? ”

ती महिला असं म्हटल्या-म्हटल्या आमचे हिरो एकदम जोरात खळखळून हसले….त्यांच्या दाढीतून दिसणारे…ते पांढरे शुभ्र दात……एकदमच उठून दिसत होते…….आणि आतापर्यंत साऱ्या ३-४ तासाच्या प्रवासात न हसलेला माणूस अगदी दिलखुलासपणे हसल्यामुळे सगळी मंडळी अजून जोरात हसली….अगदी मी सुद्धा….!!!

ह्या सगळ्या गोष्टीत, गडबड गोंधळात पुणे कधी आले समजलेच नाही…आणि ह्या माणसाची स्टाईल, बोलणं, तडतड-तणतण सगळी काही मनात राहणारी………विनोदाचा भाग सोडला तर त्या माणसाचे ते पोटाच्या बेंबीपासून अगदी पोटतिडकीने निघणारे बोल…….काहीसे मनाला विचार करायला लावणारे………….बसमधून उतरलो ते ह्याच आशेने कि ह्या माणसाची कधी तरी पुन्हा भेट होईल म्हणून….!!!

Advertisements

Entry filed under: Uncategorized. Tags: , , .

मनाला भावलेल ……………!! पूर्वजन्मीचे कर्म आणि त्याचे फळ

5 प्रतिक्रिया Add your own

 • 1. ashish  |  फेब्रुवारी 5, 2011 येथे 5:29 pm

  kay rao kay lihita kay?

  उत्तर
 • 2. prafulla  |  मार्च 3, 2011 येथे 1:47 pm

  अनुभव फार छान लिहीला आहे……..

  उत्तर
  • 3. Atul  |  मार्च 7, 2011 येथे 3:38 pm

   धन्यवाद प्रफुल्ल आपले खूप खूप आभार!!

   उत्तर
 • 4. Apurva  |  मार्च 22, 2011 येथे 5:04 pm

  Khup chan lihilay! Wachtana dolyasamor chitr ubha rahila… bhetatat ase awaliya adhun madhun waatevar…ani karun jaatat swaar aplyala wichaaranchya laatewar….

  good job

  उत्तर
 • 5. varsha  |  सप्टेंबर 26, 2012 येथे 12:23 pm

  khup mast. Asa conductor asel tar pravasacha kantala yet nahi. nahitar rojach asatat conductor agadi vaitagalele. ase vatate gharatala rag pravashyanvar kadhat aahet, ani mag pravashi pan kay kami vadala vad vadhatach jato. pan chan lihile aahe tumhi.

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Trackback this post  |  Subscribe to the comments via RSS Feed


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे


%d bloggers like this: