Archive for फेब्रुवारी, 2011
ह्या जगण्याच्या शाळेत…!!
मराठी प्राथमिक शाळा
असं आयुष्य जिथे फक्त माहित असतं
त्याला फक्त घर आणि शाळा
ज्या घरी त्याला नसतं कसलं टेन्शन
आई-वडील म्हणजे आपला ईश्वर ..आपला सारं काही पाहणारे..!!
आणि ज्या शाळेत असतात त्याचे फक्त दोनच शत्रू..
एक म्हणजे अभ्यास आणि दुसरे म्हणजे त्याचे गुरुजी ..
झालेच तर त्याची भावंड आणि गल्लीतले पोरं …भांडण करण्यासाठी…कसल्याही शुल्लक कारणावरून!!
सुट्टीच्या दिवशीच भरभरून गृहपाठ देणारे गुरुजी..
अ आ इ ई..वदवून घेणारे अन् पाढे पाठ करून घेणारे गुरुजी…कित्येकदा
नाही जमलं तर आहेच हातावर छडी अन पाठीत धपाटे….!!
अश्या गुरुजींची नुसती आठवण जरी काढली तरी चीड आणणारे..
अशातच चौथी कधी पार होते कळतच नाही…
आणि मग पुढे असते ती पाचवी..
माध्यमिक शाळा
ह्या शाळेतही त्याचे शत्रू बदलत नाही
फक्त त्यांचे स्वरूप बदलतं…..
अभ्यास नावाच्या शत्रुमध्ये असते ते इंग्रजी शिकण्याचं आणि इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करणं..
गणितं सोडवण….विज्ञानाचे सिद्धांत, भूमितीचे प्रमये पाठ करणं….
ह्या शत्रूला मित्र म्हणजे सर…..मित्र म्हणण्यापेक्षा अभ्यास नावाचा शत्रू अस्तित्वात असूच शकत नाही ह्यांच्याशिवाय…!!
इथेही त्यांच्या जोडीला असतात ते छडी आणि धपाटे…!!
ह्यांच्याच परिश्रमामुळे(सरांच्या छडी,धपाटे..इ.मुळे)दहावी होतो हा चांगले मार्क मिळून..
आणि मग सुरु होते कॉलेज जीवन..
जुनियर कॉलेज
शाळेत असेपर्यंत कॉलेजला कधी जाईल असं व्हायचं…
कॉलेजच जीवन, तिथले वातावरण सगळ असं की मन अगदी हुरळून जायचं.
जेव्हा कॉलेजला गेला तेव्हा कळायला लागल कॉलेजचे जीवन……
वर्गात थांबण्यापेक्षा वर्गाबाहेरच जास्त थांबणं …टवाळक्या करणं…..
दफ्तर न्यायचा काही विषय नाही…असलीच तर एखादी वही असायची….
त्याला कारणही तशीच…
कॉलेजमधले सर वर्गामध्ये शिकवण्याचा कंटाळा करतात …
तेच सर मात्र क्लासेसला जीव तोडून शिकवायचे…..
हे पाहिल्यानंतर मात्र चीड यायची…..आणि मग आठवण यायची ती शाळेतल्या गुरुजींची अन सरांची!!
कितीही वेळा पाढे चुकला तरी त्याचे गुरुजी जीव तोडून पाढे शिकवायचे…
नव्या-नव्या पद्धती सांगायचे पाढे पाठ करण्याचे……
अन न कंटाळता पाढे पाठ करून घ्यायचे…आता त्यांची मेहनत आठवली का त्यांचं मोठेपण समजायचं.
कॉलेजला मात्र कसलाच मार नसायचा …
इथे मात्र शत्रू बदलले होते…
कॉलेजच्याच एखाद्या पोरीवरून त्याच्याच एखादा जिगरी मित्र त्याच्याशी बोलत नसतो..
नाहीतर एखादा उगाचच भाईगिरी करत त्याला धमक्या द्यायचा असतो..
करण फक्त एखादी पोरगी..!!!!
अशातच बारावी होते…अन मग चालू होतो आणखी एक प्रवास…..
सिनियर कॉलेज…..
इथे शिकवणे हा धर्म नसतो..
आणि शिकवले तरी त्याच्याकडे लक्ष देणे म्हणजे पाप असते…
मग काय इथंही चालू होते तेच ते जगण ….कॉलेजला येण..नुसतं नावाला..
जेवढे जमतं तेवढे शिकणं स्वतःहून …..बाकी सोडून देणे.
इथेही शत्रू असतात,
आतापर्यंत सोबत असणारे गल्लीतले मित्र ,गावातले मित्र बरोबर नसतात..
सगळ काही नवीन वातावरण असतं.. त्यांच्याशीच जमून घेणे अवघड असतं..
तरीही त्यात हा जगणं शिकतो…नव्या मित्र-मैत्रिणी करतो…..
जगण्याचा आनंद शोधत असतो,
असाच सगळ पुरं करत हा होतो ग्रज्युएट!!!
मग सुरु होते खर जीवन
आतापर्यंत वाटत होते कधी हे शिक्षण सुटेल म्हणून …
जेव्हा सुटतं तेव्हा चालू होते जगण्यासाठी धडपड…
नोकरीसाठी वणवण…..
जीवनातल्या जबाबदाऱ्या अंगावर पडू लागल्या की…
सारं महत्व कळतं आपल्या आई-बापाचं……त्यांनी घेतलेल्या कष्टांच!!!
आणि मनोमन वाटतं परत घेऊन चला मला त्याच
मराठी शाळेत अन् त्याच माध्यमिक शाळेत…..
…….जिथे मार बसला तरी चालेल म्हणून…
जिथे बघायचे आहे मला जीव तोडून शिकवणारे गुरुजी अन् सर….
अन् शाळा सुटल्यावर आईच्या खुशीत मला माझी स्वप्न रंगवायची आहेत…
उद्याची……!!!
अन वडिलांच्या धाकाखाली राहूनही दंगा करायचा आहे….
तरीही मला तेच जीवन जगायचे आहे…
आजची अन उद्याची कसलीही चिंता नसलेली…मनसोक्त जगायचं आहे…. ह्या जगण्याच्या शाळेत…!!
पूर्वजन्मीचे कर्म आणि त्याचे फळ
एक महान विठ्ठलभक्त असलेला एक सज्जन नावाचा गृहस्थ पंढरपूर नगरीत कोणे एके काळी राहत होता.त्याचा मांस/मटण विकण्याचा धंदा होता अन ह्यातूनचं तो आपला उदरनिर्वाह करत असे.म्हणून लोक त्याला सज्जन कसाई म्हणत असे.तो एवढा विठ्ठल भक्त होता की असं एकाही क्षण नसेल की त्याच्या मुखी पांडुरंगाचे नाव नसेल….त्याच्या ह्या भक्तीने विठ्ठलही त्याला प्रसन्न झाला होता.त्याचा धंदा एवढा चालायचा की कधी-कधी त्याला जेवायलाही फुरसत मिळत नसे…असेच एके दिवशी त्याच्या दुकानावर खूप गर्दी होती सकाळपासून दुकानावर ग्राहकांची रांगच लागलेली होती.सज्जन सकाळपासून आपलं काम करत होता अगदी प्रामाणिकपणाने,मुखात पांडुरंगाचे नाव आहेच. आता दुपारचा एक वाजला होता. तरी दुकानातून सज्जन कसाईला जेवायला सुट्टी मिळेना…इकडे विठ्ठल-रुक्मिणी हे सगळे बघत होते.तेव्हा रुक्मिणीदेवी पांडुरंगाला म्हणते.
“भगवान, तुमच्या एका भक्ताला जेवायला वेळ मिळेना.दुपारचा एक वाजला आहे,बिचारा सकाळपासून उभा आहे..जा त्याला जेवायला सुट्टी द्या..”
“हो बरोबर आहे तुमचे..मलाही पाहवत नाही त्याचे कष्ट…मला आता जावेच लागेल.” असं भगवान विठ्ठल म्हणत लगेच सज्जन कसाईच्या दुकानावर हजार झाले आणि सज्जन कसाईला जेवायला सुट्टी दिली.
तर अशी ही भक्ती होती सज्जन कसाईची..जिथे स्वतः पांडुरंग त्याची काम करत …..म्हणजे त्याची भक्तीही तेव्हढी श्रेष्ठ असेल.तर हा सज्जन कसाई भजन,अभंग ह्यातून पांडुरंगाच गुणगान करायला कधीही कमी पडत नसे,एकादशीला निरंकार उपवास करणे,नियमित वारीला जाणे.अन मुखात अखंड हरिनामाचा जप करायचा….
तर असेच एके दिवशी सज्जन कसाईच्या मनात आले की जगन्नाथ पुरीला जाऊन यावे.मग काय मनात आले म्हणजे ते पुरे करावे लागणार मग हा विचार आपल्या बायकोला सांगितला आणि एका दिवशी सज्जन कसाई जगन्नाथ पुरीला निघाला एकटाच…..
मजल-दरमजल करत रोज हा माणूस जगन्नाथ पुरीची वाट चालू लागला.दिवसभर चालायचे रात्र झाली का एखाद्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करायचा जे खायला मिळेल ते खायचे..सकाळ झाली का परत आपली वाट धरायची …मुखात सदैव देवाचे नाव.७-८ दिवस गेले त्याची रोजचाच नित्यक्रम .दिवसा पायपीट करायची रात्री आराम करायचा.
एके दिवशी असाच दिवसभर चालून चालून थकलेला सज्जन कसाई…एका घरी मुक्कामी थांबला.त्या घरीच जेवण केले…जेवण झाल्यानंतर त्या घराच्या अंगणातच तो झोपण्यासाठी अंथरून टाकले…आणि दिवसभर थकलेला असल्यामुळे लगेच ततिथे पडून घेतले…उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मस्त गार-गार वारा सुटलेला ..वरती निरभ्र आकाश ..आर्धाकृती चंद्र..बऱ्यापैकी उजेड …टिपूर चांदणे पडलेले…दिवसभर थकलेले शरीर आणि मन अगदी उस्ताही आणि प्रसन्न झाले…..ह्या टिपूर चांदण्याकडे बघताच सज्जन कसाई झोपी गेला….असेच १०-१५ मिनिटे झाली असतील तेच कोणीतरी आपल्याला धक्का दिल्याचे सज्जन कसाईला जाणवले….डोळे उघडून बघितले तर तो चकितच झाला आणि समोर पाहतो तर त्या घराची एक सुंदर तरुण बाई त्याच्यासमोर बसलेली होती…ह्याच माउलीने मला आज जेवण दिले होते हे त्याला ओळखायला वेळ नाही लागला.
“काय ….काय झाले..?” अगदी घाबरलेल्या आवाजात त्याने विचारले.
“घाबरू नका…..” ती तरुण स्त्री अगदी सौम्य आवाजात त्याला म्हणाली.त्याच्या थोडेसे जवळ येत…
“नाही…म्हणजे काही पाहिजे तुम्हाला …” तो तिच्यापासून लांब सरकत…
“काही नाही ..तुम्ही एवढे तेजस्वी आहात..मला तुमच्याशी संबंध ठेवायचे आहे..जेव्हापासून तुम्हाला बघितले तेव्हापासून मला चैनच नाहीये…” ती तरुण स्त्री अगदी लडिवाळ आवाजात बोलत होती….अगदी कोणीही तिच्या जाळ्यात सहज ओढला जाईल अशा प्रकारे…. पण सज्जन कसाई घाबरून गेला आणि तिला समजू लागला..
” नाही माऊली,मी असं नाही करू शकत मी एक विठ्ठल भक्त आहे……..तुम्हाला काही लाज आहे की नाही तुम्ही एक विवाहित आहे अन तुमचे पती तिकडे झोपलेले आहेत ..”
” आहो तुम्ही कोणालाही घाबरू नका ….अगदी माझ्या नवऱ्याला सुद्धा !!” असं म्हणत ती त्याच्या अजूनच जवळ येऊ लागली…
आता मात्र सज्जन कसाई थोडेसे चिडले..आणि त्याने तिला असं बाजूला केले आणि ते तिथून उठून चालायला लागले…
तेव्हढ्यात ती बाई म्हणाली …
” तुम्ही कोणाला घाबरताय…माझ्या नवऱ्याला ” .असं म्हणत म्हणतचं तिने अंगणात असलेली कुऱ्हाड उचलली आणि घरातल्या खोलीत झोपलेल्या आपल्या नवऱ्याच्या मानेवर टाकली..
क्षणात तिने आपल्या नवऱ्याचे शीर आणि धड अलग केले ….हे पाहून तर सज्जन कसाईचा पारा एकदम चढला ..डोळे लाल बुंद झाली..
तेव्हड्यात ती स्त्री त्याच्या दिशेन आली आणि म्हणाली
“आता बघा…मी माझ्या नवऱ्याला पण मारले आहे….आत्ता तुम्हाला कोणालाही घाबरायचे कारण नाही…” कामेच्छेने पेटलेली ती बाई असं म्हणत सज्जन कसाईला येऊन बिलगली ..दुसऱ्याच क्षणी सज्जन कसाईने उलट्या हाताची तिच्या गालफडात लगावली आणि ती अंगणात जाऊन पडली…
“अरे तू बायको आहे का …वैरीण… आपल्या पतीला मारले तू जो की परमेश्वरासामान असतो….परमेश्वर तुला कादापी माफ करणार नाही..” लाल-बुंद झालेले डोळे जणू आग ओकत होते…….असे म्हणत ते चालू लागले ….
हा माणूस काही आपलं ऐकत नाही असं समजल्यावर मात्र ती आता चवताळून पेटली आणि म्हणाली
“थांबा……जाताय कुठे….? माझे ऐकत नाही का ? ” असं म्हणत ती जोर जोराचा आरडा -ओरडा करू लागली..
“वाचवा वाचवा…” असं आरोळी देताच आजूबाजूचे लोक धावत पळत आली आणि काय झाले झाले असे विचारू लागली,लगेच त्या बाईने सांगितले की ह्या माणसाने माझ्या नवऱ्याला मारले..म्हणून…सज्जन कसाईचे काही ऐकून घेण्याच्या आतच त्या जमलेल्या लोकांनी त्याला मारायला सुरवात केली आणि अगदी बेदम मारहाण केली…सज्जन कसाई जमिनीवर कोसळून विव्हळत होता..देवाचा धावा करत होता….त्या जमलेल्या लोकांनी त्या बैला विचारले की काय शिक्षा द्यायची ह्याला म्हणून….
“ह्याचे दोन्ही हात कापून टाका….अगदी मुळापासून…ह्याच हातानी माझ्या नवऱ्याचा खून केला आहे.” असं म्हटल्याबरोबर त्या लोकांनी तिथेच पडलेली कुऱ्हाड घेतली..आणि सज्जन कसाईचे दोन्ही हात काढून टाकले….सज्जन कसाईच्या डोळ्यातून मात्र आता रक्ताच्या धारा चालू होत्या…….हे सगळे झाल्यानंतर जमलेली सगळी मंडळी निघून गेली….रात्रीचे १२-१२:३० वाजले होते..सज्जन कसाई तिथून हळू हळू चालू लागला….मनात असंख्य प्रश्न घेऊन…देवा काय गुन्हा केला होता मी ? का आला नाही माझ्या मदतीला धावून?कुठे माझी भक्ती कमी पडली? काय करू मी आता जागून ? हे सारे प्रश्न त्याला त्याच्या पांडुरंगाला विचारयचे होते…….अंधारातच चालत होता….खांद्यामधून भळाभळा रक्त वाहत होते…..खाली पायाला ठेचा लागत होत्या त्याच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते..आकाशाकडे बघत आता तो काही वेळा पूर्वी सुंदर वाटणाऱ्या चंद्र-चांदण्यामध्ये तो आता आपल्या पांडुरंगाला पाहत होता…..रस्ता कुठे चालला आहे ते काही माहित नव्हते….रात्रीच्या त्या भयाण वेळी फक्त रात-किड्यांचा कीर-कीर आवाज येत होता..असं तो बरेच २-३ मैल चालला असेल …पहाटचे ४-४:३० वाजले होते…एक भल मोठे वडाचे झाड त्याला दिसले..त्याने ठरवले की मी आता इथेचं बसणार आणि मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय आणि माझ्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही म्हणून…असं विचार करत तो तिथेच त्या वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाला…पांडुरंगाच नाव घेत..!!!!!
असाच तास-दीड तास झाला…पांडुरंगाला आपल्या भक्ताची हाक ऐकू आली आणि ते सज्जन कसाईसमोर उभे राहिले ..त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला उभे केले…आपल्या पांडुरंगाला पहिल्या पहिल्या सज्जन कसाई खूप -खूप रडला….रडता-रडताच पांडुरंगाला प्रश्न विचारू लागला..
“का देवा ? का असे झाले? काय गुन्हा केला होता मी…? कुठे माझी भक्ती कमी पडली? त्या स्त्रीची मागणी मी मान्य नाही केली ह्यात काय चुकी होती माझी..?सांग देवा..”
“अरे हो शांत हो सज्जन…!! तुझी ह्यात काही काही चुकी नव्हती….तुझी भक्तीही कुठे कमी नाही पडली….पण हे तुझे पूर्व जन्मीच्या कर्माचे फळ आहेत ..” अगदी शांत आवाजात पांडुरंग त्याला समाजावात होते…
” म्हणजे ? मी समजलो नाही देवा?” थोडाश्या सावरलेल्या सज्जन कसाईने विचारले.
” पूर्व जन्मीच्या कर्माचे भोग कधी कोणाला चुकले नाही आणि चुकाणारही नाही…तू मागच्या जन्मही एक वाटसरू होता…ह्याच वाटेने जाणारा….
तुझे ज्या स्त्रीने हे हाल केले ती स्त्री ही मागच्या जन्मी एक गाय होती आणि त्या स्त्रीचा नवरा हा एक कसाई होता..तू एक दिवस असाच रस्त्याने चालला होता तेव्ह्या त्या कसाईने तुला ती गाय पकडून दे म्हणून सांगितले….आणि तू ती गाय पकडून कसायाच्या हाती सोपवली…त्या कसाईने त्या गायीचे तुकडे तुकडे केले..आणि साऱ्या गावाला वाटून दिले….ह्या केलेल्या कर्माचे फळ तुला अन त्या स्त्रीच्या नवऱ्याला भोगावे लागले ह्या जन्मात….त्या स्त्रीने तिचा बदला चुकता केला ह्या जन्मी…आणि म्हणूनच मला कितीही वाटले तरी मी तुला मदत नाही करू शकलो.”
” मग देवा …ह्यातून काहीच सुटका नाही का माझी….” सज्जन कसाई एकदम शांत झाला होता आता..
” नाही….तुझे भोग तुला भोगावेच लागेल..पण तू एक करू शकतो तू आतापर्यंत चांगलेच काम केले आहे…उरलेल्या आयुष्यात सुद्धा चांगले काम कर आणि अखंड देवाची भक्ती कर ..तुझा पुढचा जन्म नक्कीच चांगला होईल आणि चांगल्या कामी खर्च होईल..”
” ठीक आहे देवा…मी नक्की प्रयत्न करीन.” असं सज्जन कसाईने म्हटल्यानंतर पांडुरंग तिथून अंतर्धान पावले…आणि थोड्या वेळाने दिवस उजाडला……सूर्य समोरच असलेल्या डोंगरातून डोकाऊ लागला…….आपल्या सोनेरी किरणासंगे….आणि सज्जन कसाईने पण आपली वाट पकडली होती…जगन्नाथ पुरी कडे जाणारी…..!!!!!!!!!
[ता.क.:- ही कथा मी एका प्रवचनात ऐकली आहे…तीच इथे मांडली आहे माझ्या शब्दात…कथेचा सार मात्र तोच आहे.प्रतिक्रिया द्यायला विसरू नका]
असेच अनुभवलेले…….थोडसे विचार करायला लावणारे…….!!!
आपल्या जीवनात रोज कोणी न कोणी भेटत असतं.. ……कोणी ओळखीचे …तर कोणी अनोळखीचे…….जे ओळखीचे असतात ते आपल्याला जीवनात ह्या ना त्या मार्गाने प्रभाव पडताच असतात…..पण जे अनोळखीचे असतात ते पण आपल्याला जीवनात काहीतरी शिकवून जातात तर कधी कधी असाच उगाच विचार करायला भाग पाडतात….असाच माझा एक अनुभव इथे मांडतोय….
९-१० दिवसापूर्वी पुण्याकडे येत होतो….संगमनेरहून….नेहमीप्रमाणे एक बस पकडली …आपला लाल डब्बा….जेव्हा बस मध्ये बसलो तेव्हा एक उगाचच एक वेगळी जाणीव व्हायला लागली ………….बसही थोडी रंगीबेरंगीच होती…बसच्या खिडक्यांच्या काचेवर लिहिलेले ..ते “जय भवानी जय शिवाजी..” ” जय महाराष्ट्र……”चे शब्द… एकदम महाराष्ट्र अभिमान जागवत असल्यासारखी वाटणारी…कोपरगाव आगाराची बस होती ती…..तर असो…
माझ्या मुख्य पात्राकडे वळतो…बस कंडक्टर..दाढी वाढवलेला……सावळा रंग असलेला…कपाळाला टीळा लावलेला….उंची चांगली ६ फूटच्या जवळपास…शरीरयष्टी एकदम कडक……. तडफदार आवाज…(ते पुढे समजेलच तुम्हाला)…………
प्रवाशी लोक जोपर्यंत खिशातून पैसे काढत आहे तोपर्यंत हा माणूस आपला त्या प्रवाश्याकडे पाहत राहणार………हाताची घडी घातलेली ..मागच्या सीटला टेकुन….आपली दाढी हळूच कुरवाळत…..एक गुढ नजरेने बघणे…अन जेव्हा लोक २०-२५ रु.च्या तीकीटासाठी १००-५०० च्या नोटा काढायचे तेव्हा मात्र हा माणूस एकदम तडतड करायचा……….
“कोणाकोणाला सुट्टे पैसे देऊ…….?? सुट्टे पैसे द्यायला काय होते तुम्हाला….माझ्याकडे काय बँक आहे का सुट्टे पैश्यांची वैगरे वैगरे…असं बरेच काही …तरीही प्रवाशी लोक मुकाट्याने त्याचे बोल ऐकून घ्यायचे …….कोणी काही बोलत नसे..कारण त्यांना बहुतेक माहित असावे की हा माणूस कुठून न कुठून सुट्टे पैसे देतील म्हणून……..!!!
मी अगदी बसच्या एकदम शेवटून दुसऱ्या-तिसऱ्या सीटवर बसलेलो होतो…….मला ह्या माणसाचे जरा कुतूहल वाटले म्हणून मी आपल्या कुतूहलापोटी त्याच्या प्रत्येक हालचालीवर/बोलण्यावर बारीक लक्ष ठेवून होतो….माझ्यापर्यंत तिकीट काढायला येईपर्यत……
“शिवाजीनगर एक ” मी आपले एकदम जेवढे तिकिटाचे पैसे आहेत तेव्हढे पैसे अगदी सुट्ट्या पैश्यासाहित त्या माणसाच्या हातात दिले…
“ओन्ली वन….!!!फक्त एकाच तिकीट आहे पुण्याचं….आख्या बसमध्ये…बाकी हे सगळे आधले -मधले…..” आपल्या हाताने एक आकड्याची खून करून दाखवत तो एवढ्या मोठ्या आवाजात बोलला कि साऱ्या बस मध्ये आवाज घुमला………
मी असेच थोडे स्मितहास्य केले अन क्षणभर मला मी जसा काही विशेष माणूस आहे असं वाटले….ते थोड्यावेळापुरतेच कारण माझ्या मागे बसलेल्या अजून एका प्रवाश्याने पुण्याचे तिकीट काढले होते……..ते अमराठी असावेत कारण कंडक्टर त्याच्याशी आपले तोडक्या मोडक्या हिंदीत बोलत होते… बर असो..
ह्या कंडक्टरचे सगळ बोलणं आणि सारा अवतार बघून माझ्या शेजारचा एक प्रवाशी म्हटला सुद्धा कि ह्याला येरवड्याला न्यायची गरज आहे म्हणून…!! मी मात्र त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही दिले आणि फक्त ह्या साऱ्या गोष्टीचा आनंद घेत होतो….आलेला क्षण अनुभवायचा……!!
असाच तास -दीड तास झाला……….प्रवाशी चढ-उतार करतच होते…मी आपला ह्या माणसाचे निरीक्षण करतच होतो….
पुढे आल्यानंतर हायवे वर एक अपघात झालेला होता…एक कंटेनर आणि एका तवेरा गाडीची जोरात धडक झालेली होती….त्या तवेरा गाडीचा पूर्ण चुराडा झाला होता…..
“ये देखो इंडिया शायनिंग….” आमचे मुख्य पात्र (कंडक्टर) माझ्या मागे बसलेल्या अमराठी प्रवाश्याशी बोलत होते…हिंदीत…एकदम उच्च आवाजात…!!
“ये शायानिग इंडिया बोलते है…..अपने नेता लोग….और ये देखो कैसे होता है….!!!” त्या झालेल्या अपघाताकडे हात करत ते बोलतच होते…
“हा ना……कायका शायनिंग…!” ते प्रवाशी पण ह्यांना चांगला प्रतिसाद देत होते….मी मात्र आता त्यांच्याकडे आता काय बोलणार म्हणून कान-डोळे दोन्हीपण त्यांच्याकडे रोखून होतो…..
“बहुत अवघड है सब……” ते पुढे बोलतच होते….आपली मराठी हिंदीत कधी घुसडली जाते तेच काही कळत नाही मराठी माणसाला… अन् त्याशिवाय आपण हिंदी बोललो ह्याच समाधान पण वाटत नाही….मराठी माणसाला…असं मला वाटत…
“देखो तुमको बोलता हूँ … ..बहुत अवघड है…..तुमको मालूम नही होगा यहाँ रंजनगाव (रांजणगाव..म्हणायचे असावे बहुतेक पण हिंदी बोलत होते म्हणून..) बहुत अच्छी एकदम फर्स्ट क्लास एमआयडीसी बनी है…”
” हा हा….. पता है………….. ” त्या प्रवाश्याचा दुजोरा…..त्या प्रवाश्याच बोलण् मध्येच तोडत..
“अब वहा के लोगो ने क्या किया उनकी जमीन थी ….अच्छे पैसे मिले..बेच डाली……तो जब पैसा हात में आया तो ..फिर शायनिंग मारते रहे….अच्छे अच्छे हाटेल में खाना खायेंगे ..भारी-भारी गाडी लेंगे…शायनिंग मारेंगे…….और अब वही लोग वहा पे वाचमन का काम करते है….बहुत अवघड है…….और ये सब जगह होनेवाला है…..सब लोग भिकारी बनेंगे…देखना तुम…..!!! त्यांचा पट्टा चालूच होता…इतका जोरात आणि फास्ट कि मला एकदम प्रहार मधला नाना पाटेकरच आठवला…..आणि आपली सगळी चीड तो इतका जोर-जोरात सांगत होता कि सारी बस सुन्न झाली होती….. …………
“सही बात है…” तो अमराठी माणूस….
पण हे जे काही हा माणूस बोलला ते मला एकदम मनाला पटलं …….आताच्या जगात लोक फक्त पैशाची उधळपट्टी करतायेत….पुढचा विचार कोणी नही करत……..फक्त मौज-मज्जा करायची……..फक्त पैसा पाहिजे लोकांना…ना पर्यावरणाचा विचार करायचा की अगदी माणसांचा पण नाही की माणुसकीचा सुद्धा नाही….
बस पुढे चालूच होती….नारायणगावामधून १०-१२ प्रवासी चढले…त्या कंडक्टरची तीच स्टाईल ….लोकांकडे बघणे…….सुट्टे पैसे नही दिले तर तणतण करणे….पण तरीही कोहीही प्रवाशी त्यांच्याशी हुज्जत घालत नही बसले…हे विशेष…
एक २५-२६तला तरुण…. .नारायणगावामधून बसलेला…तिकीट काढायच्या वेळेस १०० ची नोट काढली….आमचे हिरो आता एकदम तापले….
“भाऊ..दोन पन्नास नाहीयेत का?” कंडक्टर
“नाही ना…असते तर दिले असते..” तो तरुण..अगदी सौम्य आवाजात.
” मग कसं तिकीट काढायचं ..सगळे इथे १००-५०० च्या नोटा काढतायेत…कोणाकोणाला…………” त्यांचा तो पट्टा चालू झाला…. “देतो ना..बस मध्ये कोणाकडे तरी सुट्टे बघून देतो….” तो तरुण…
“अरे देतो ….करतो…..असं म्हणणारे खूप आहेत…आश्वासन देऊ नका….पुढाऱ्यासारखे.” असं म्हटल्याबरोबर आम्ही चार-पाचजण हसू लागलो..ते मात्र अगदी रागातच होते…त्यांचा तो रोष आता कदाचित राजकारण्याकडे होता…….. आपल्या नेते मंडळीवर असलेला राग इथे आग ओकत असल्यासारखे बोलत होते…..
” बोलण सोपं असत….. करण अवघड असत…..समजलं का? ” त्यांचा पट्टा चालूच होता…
“नाही नाही खरेच देतो….” तो तरुण प्रवासी असं म्हटल्यावर त्यांनी असेच वाकडा-तिकडा चेहरा करून तिकीट फाडले…मी मात्र ह्या गोष्टींचा विचार करत होतो की अशी माणस राजकारणात का नाहीये………आपला भारत तरी आजच्या भ्रष्टाचारापासून वाचला असता…..
तेवढ्यात तो तरुण आम्हाला म्हणाला की हा कंडक्टर जे काही बोलतो ना….त्याचा मला कधीच राग येत नाही ….मी बऱ्याच वेळा ह्या बस मध्ये जातो….वेळ कसा निघून जातो कळतच नाही..आणि खरच त्यांच्या बोलण्याचा कधीच राग येत नाही..कारण मला माहितेय आतापर्यंत त्याच्याशी कोणीही हुज्जत नाही घातली……….त्याचा प्रवाश्यांशी बोलताना असलेला राग हा फक्त वर –वरचा असेल कदाचित म्हणूनही असेल….
एक ५०-६० च्या वयातली महिला प्रवाशी……लुगड घातलेली….तिलाही पुण्यात जायचे होते…म्हणून तिने १००ची नोट काढली..
“मावशी ..पाच-दहा-पन्नास काही सुट्टे आहेत का..? ” कंडक्टर महाशय त्या महिलेला विचारताय…
“नाही ना ..भाऊ…” ती महिला
“दोन रुपये….चार रुपये…काही सुट्टे ?” ते
“नाही..” ती
“मग किती आहे.?” ते महाशय थोड्या रागातच….
“पाचशेची नोट आहे……देऊ का? ”
ती महिला असं म्हटल्या-म्हटल्या आमचे हिरो एकदम जोरात खळखळून हसले….त्यांच्या दाढीतून दिसणारे…ते पांढरे शुभ्र दात……एकदमच उठून दिसत होते…….आणि आतापर्यंत साऱ्या ३-४ तासाच्या प्रवासात न हसलेला माणूस अगदी दिलखुलासपणे हसल्यामुळे सगळी मंडळी अजून जोरात हसली….अगदी मी सुद्धा….!!!
ह्या सगळ्या गोष्टीत, गडबड गोंधळात पुणे कधी आले समजलेच नाही…आणि ह्या माणसाची स्टाईल, बोलणं, तडतड-तणतण सगळी काही मनात राहणारी………विनोदाचा भाग सोडला तर त्या माणसाचे ते पोटाच्या बेंबीपासून अगदी पोटतिडकीने निघणारे बोल…….काहीसे मनाला विचार करायला लावणारे………….बसमधून उतरलो ते ह्याच आशेने कि ह्या माणसाची कधी तरी पुन्हा भेट होईल म्हणून….!!!