“पिंजरा” ची आठवण

जानेवारी 7, 2011 at 9:44 pm 4 comments

काल असाच ऑफिसमधून घरी जाताना माझा अन माझ्या मित्रांचे बोलणं चालू होते मराठी चित्रपटांबद्दल…..बोलता-बोलता अशीच आठवण झाली मराठी चित्रपट “पिंजरा” ची….आपोआपच पिंजरा चित्रपटाच्या आठवणीत रमून गेलो मी…………

मला आठवतंय मी माझ्या गावात हा चित्रपट  पहिला होता..अन् तोही  पडद्यावर….हो पडद्यावर…अन् मी स्वत:ला नशीबवान समजतो की मी पडद्यावर “पिंजरा”बघितला..एक अति उत्कृष्ट चित्रपट!!!!  साधारण १२-१३ वर्षाची गोष्ट…..आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे यात्रा असते..तर दरवर्षी गावात एक तर तमाशा असतो किंवा एखादा चित्रपट असतो(आताच्या काळात फक्त तमाशेच होतात…….कारण घरोघरी डिश टी.व्ही.,सी.डी/डी.व्ही.डी.प्लेयर आणि भरपूर चैनेलचा सुळसुळाट झाला आहे म्हणून कोणी चित्रपट बघायला पण येत नाही)

हा तर त्या वर्षी अशीच गावाची यात्रा होती..अन् साधारण एप्रिल-मे चे दिवस ..म्हणजेच उन्हाळ्याचे दिवस ..तर त्या काळी मनोरांजानासाठी काय जास्त टी.व्ही.वैगरे नव्हते गावात..म्हणून व्हीसीडी/सीडी/डीव्हीडी प्लेयर ह्यांचाही काही विषय नाही…जेव्हा-जेव्हा काही  कार्यक्रम असायचे गावात म्हणजे नाटकं,भारुड,रामलीला,तमाशा कीर्तन,प्रवचने ई.असं काहीही असले का लोकं आवर्जून हजर राहायचे अश्या कार्यक्रमांना,दिवसभर सगळे शेतीत राब-राब राबून थकलेली असायची तरीपण…!!!!

तर अश्याच एक यात्रेच्या दिवशी ‘पिंजरा’ हा सिनेमा ठेवला होता,गावात..तोही पडद्यावर..आता पडद्यावर म्हणजे बहुतेक लोकांना समजले असेल की पडद्यावर सिनेमा कसा असतो..तरीपण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो..पडद्यावर म्हणजे एक भाल मोठे पांढरे-शुभ्र धोतरासारख कापड स्क्रीन म्हणून लावायचे..जवळजवळ १०*१० फूटचे..व्ही.सी.आर.प्लेयर असतो त्याच्या लाईटचा फोकस हा त्या स्क्रीनवर(धोतरावर) धरायचा आणि त्यात सिनेमाची फिल्म टाकायची एका बाजूने आणि जसा जसा सिनेमा पुढे-पुढे जाईल तसे तसे त्या व्ही.सी.आर.ला असणारे चाक फिरवत बसायचे….असच काहीतरी असतं (मी जेव्हा हा सिनेमा बघितला तेव्हा मला एवढेच  समजले होते)…आणि  आता असे पडद्यावरचे सिनेमे बघायला भेटत नाहीत….

तर त्या दिवशी असच संध्याकाळी समजले की आज गावात “पिंजरा” चित्रपट आहें म्हणून…..मग काय आम्ही सगळी मंडळी खुश होतो..तश्या पण उन्हाळ्याचा सुट्ट्या चालू होत्या..म्हणून अभ्यास वैगरे काही नव्हता…..तसा चित्रपटाचा वेळ ९ वाजताचा होता,पण नेहमीप्रमाणे १० वाजेपर्यन्त चित्रपट चालू होत नाही म्हणून घरून ९ला निघालो होतो..आमचे घर गावापासून दूर आहें म्हणजे शेतात.. गावापासूनजवळ-जवळ २ की.मी.मग आम्ही सर्वजण (भाऊ,आई,मळयातले सगळे मित्र आणि बाकी सगळी बायका-पुरुष मंडळी)गावात निघालो….पायी चालत-चालत……रात्री ९-९:३० ची वेळ..मोकळ आकाश..टिपूर चांदणे पडलेले अन् भला मोठ्ठा चंद्र आम्हाला रस्ता दाखवायला होता…

काय सुंदर वातावरण ते..मस्त टिपूर चांदणे पडलेले..चंद्रपण आमच्या सोबतीला चालणारा..अधून मधून वाऱ्याची झुळूक येणार,रातकिड्यांचा तो कीर-कीर आवाज, अंधाऱ्या रात्री ते लुक-लुक करणारे काजवे,तो खड-खड रस्ता……सार काही काल घडल्यासारखा डोळ्यासमोर येत………..आता असं गावात जाणे होत नाही आणि पहिल्यासारखे गावात कार्यक्रम पण नाही होत….बर असो..तर असच एक एक करत आम्ही गावात पोहोचलो…आणि काही वेळातच चित्रपट चालू झाला…..

त्यावेळी साधा थियटर काय असते ते माहित नव्हते तर मल्टीप्लेक्स तर दूरचीच गोष्ट….!!!

गावच्या मंदिरासमोर असलेल्या मोठ्याशा पटांगणात लावलेला तो पडदा….जराश्या खोलगट भागात तो उभा केलेला होता.सगळी गावकरी मंडळी त्या मैदानावर खालीच जमिनीवर बसलेले..कोणी मांडी खालून बसलेले तर कोणी असेच पाय पसरून बसलेले..पटांगणही मोठे असल्यामुळे जागेचा काही प्रोब्लेम नव्हता…साधारण ३००-३५० लोकं असतील.मस्त सगळी लोकं आरामात बसलेली…..मधून मधून हवेची झुळूक येत होती..मल्टिप्लेक्समधल्या ए.सी. ला पण ह्या हवेची झुळूकची सर् नाहीये हे मी खात्रीने सांगु शकतो…….शेवटी निसर्ग तो निसर्गच..

तसे चित्रपट चालू होण्याचा अगोदर मनात कसलेही पूर्वग्रह/समज,नव्हते की काही नाही…चित्रपट कसा आहें….चांगला की वाईट..चित्रपट कुणाचा आहें,कोणी दिग्दर्शित केलाय,कोण-कोण कलाकार आहेत तेही काही माहित नव्हते..आता जसे एखादा नवीन चित्रपट आला तर त्याची सगळी माहिती घेवूनच तो बघायला जातो..तसे तेव्हा काही नव्हते…अगदी फक्त जो क्षण येतोय त्याचा आनंद घ्यायचा बस एवढेच…!!!!

जेव्हा सिनेमा चालू झाला तेव्हा सुरवातीला तो एवढा मोठा पडदा बघून त्याचे नवलच वाटले होते..त्यात दिसणारे ती माणसं पण एकदम मोठे मोठे दिसत होते…आम्ही बऱ्यापैकी दूर बसलेलो होतो आणि पडदा एकदम असं खोलगट भागात होता म्हणून आम्ही एकदम बाल्कनीत बसल्यासारखे वाटत होते..,पण एक प्रकारचा आनंदच होता..पहिल्यांदाच एवढ्या मोठा पडद्यावर चित्रपट बघत होतो म्हणून….!! ह्याच्यागोदर आम्हाला फक्त रामायण आणि महाभारत बघायची सवय ते पण फक्त आपल्या ब्लँक-व्हाईट टी.व्ही.वर आणि कधी कधी रविवारचा ४ वाजता असणारा मराठी चित्रपट,नँशनल चैनेलवर(त्यात आमचे लक्ष्या-अशोक सराफचे चित्रपट असले की आम्ही ते चित्रपट बघितल्याशिवाय राहत नसे…फक्त तेव्हा आमच्या महाराष्ट्र  वीज महावितरण मंडळाची  कृपा असली तर..नाहीतरी भारनियमन पाचवीला पुजलेलेच आहें गावाकडे..तेव्हाही आणि अजूनही….!!!)

जेव्हा सिनेमा चालू झाला तेव्हा त्यात फक्त सुरवातीला गाणेच होते जास्त..एकवेळ मनात आले की एवढा काही हा सिनेमा चांगला नसावा….

अर्धा-पावून तास असाच गेलं थोडासा कंटाळवाणा…..जसा-जसा हा सिनेमा पुढे-पुढे सरकू लागला तसा-तसा त्यात इंटरेस्ट येऊ लागला..

मास्तरची/नायकाची अप्रतिम भूमिका करणारे डा.श्रीराम लागू(काही वर्षानंतर कळले की श्रीराम लागूंचा हा पहिलाच चित्रपट होता)अन् एक लावणी(नर्तकी)कलाकार म्हणून “संध्या” ही अभिनेत्री..ह्या कलाकारांचे नावसुद्धा माहित नव्हते अगोदर की बघितलेले पण नव्हते कधी .त्यातल्या त्यात फक्त निळू फुले तेवढे ओळखीचे कलाकार होते…बाकी सगळे अनोळखी..!!!

मास्तरांची भूमिका श्रीराम लागूनी एकदम व्यवस्थित ठसवली आहें.काही गोष्ठी नं बोलताही त्यांनी उत्तमरीत्या साकारल्या आहेत……त्यांचे चेहऱ्यावरचे भाव बरचशे काही सांगून जाते…

आणि संध्याची भूमिका काय म्हणावे…तिचा तो मास्तराचा बदला घ्यायचा म्हणून केलेला थयथयाट..हातात तुण-तुण घेऊन म्हटलेलं वाक्य……..

“नाही बोर्डावर तुण-तुण घेवून उभ केलं तर नावाची ………!!” त्या वाक्याबरोबर असणारे तिचे चेहऱ्यावरचे हाव-भाव,भुवया उंचावणे मुरका मारून तिथून निघून जाणे..अप्रतिमच!!!

ह्या पिक्चरमध्ये असणारे गाणे…”दिसला ग बाई दिसला…”,”आली ठुमकत नार लचकत..”,”मला लागली कुणाची उचकी..” अशी एकाहून एक अप्रतिम गाणे…… उत्कृष्ट नृत्यासाहित..!!

काय काय लिहू अन् कशाबद्दल लिहू..शब्दही कदाचित कमी पडतील…जगदीश खेबुडकरांची गीते, संध्याचे नृत्य,जेव्हा काही ही गाणे चालू असतं तेव्हा एकदम समोर खरा-खुरा तमाशा चालू आहें असेच वाटत होते.गावातली बरीचशी  मंडळी एकदम शिट्या मारून ह्या गाण्याची मजा घेत होते.. गणपत पाटलाचं नाच्याचे कामही छानच होते..

नंतर ते मास्तरला तिच्या जाळ्यात ओढणे..मुलं शाळेत प्रार्थना म्हणत असताना शाळेत येऊन गाणे वैगरे म्हणणे…सगळं काही एकदम उत्तमरित्या सदर केले आहें दिग्दर्शकाने….आणि मग नंतर मास्तरला स्वत:च्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक …सगळं कसे एकदम सहजच घडते असं वाटत….मग पुढ त्या मास्तरचा तिच्याबरोबरचा तमाशातला प्रवास…

आणि मग खरच तुण-तुण घेवून बोर्डावर उभा राहिलेला मास्तर बघितला का मन एकदम हळव होऊन जात…आणि ते ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणे ऐकताना आणि पाहताना अगदी डोळ्यातून पाणी येत…ह्या गाण्यात पूर्ण चित्रपट आला आहें…..(ज्यांनी कोणी हा चित्रपट पाहिलेला नाही त्यांनी एवढे गाणे जरी बघितले तरी पूर्ण चित्रपट समजेल…पण पूर्ण चित्रपट बघण्यात जी मजा आहें ती काही वेगळीच ..:))

हे गाणे एकदम अप्रतिम लिहिलेले आहें जगदीश खेबुडकरांनी, त्यातल्या काही ओळी तर एकदम मनाला भिडून जातात….

माझ्या  काळजाची तार आज छेडली

कशी नशिबाने थट्टा आज मांडली!!

गंगेवाणी निर्मल असलेल्या,सगळी प्रजा सुखी असलेल्या गावात एक भोळा भाग्यवंत होता…’मास्तर’सगळ गाव त्यांना पुण्यवान म्हणत होते..अन् त्यांना मानतही होते…पण अश्या ह्या भोळ्या-भाग्यावंतस एका नर्तकीची द्रिष्ट लागली….तमाशा गावात आला तेव्हा मास्तरांच्या जीवाची घालमेल झाली, गावाची लोकं नाच-गाण्याच्या मागे लागून वेडे होतील, पोरं शाळा शिकणार नाही …अन् मग गावाचा विकास होणार नाही…म्हणून तमाशाला गावातून बाहेर काढून दिले पाहिजे असे वाटले..अन् मग गावाच्या भल्यासाठीच तमाशाला नदी पार करायला लावली…तमाशाची सावलीही गावावर पडायला नको म्हणून..!!!

पण तमाशातील नार सूड भावनेने पेटली होती, तिला ह्या मास्तराचा बदलाच घ्यायचा होता म्हणून तर तिने शपथ घेतली मास्तरला बोर्डावर तुण-तुण घेऊन उभ करण्याची..!!     हेच सांगणाऱ्या पुढच्या ओळी..

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली

गावासाठी नर्तकीला, नदीपार केली

नार सूड भावनेन, उभी पेटली

कशी नशिबाने थट्टा आज मांडली!

पिसाळलेल्या नागिणीसारखी त्या नाचणीने थयथयाट केला,पण गावाची लोकं पुरती वेडी झाली होती तामाश्यामागे अन् नाच-गाण्यासाठी….लोकं आपला गावं सोडून तमाशा बघायला नदी पार करून जाऊ लागली……गावाच्या भलं बघणाऱ्या मास्तरांना हे खटकलं म्हणून त्या नाचनीला जाब विचारायला गेला, पण त्या नागिणीने घात केला,तिने डाव केला आणि भोळ्या मास्तरालाच तिच्या श्रुगाराच्या जाळ्यात ओढले.. …अशातच त्या नर्तकीची इज्जत वाचवता वाचवता अनवधानानं मास्तरांच्या हातून खून होतो….आणि तिथेच मास्तर पुरता फसतो…

खुळ्या जीव कळला नाही,खोटा तिचा खेळ

तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल

त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली

कशी नशिबाने थट्टा आज मांडली!

भोळ्या जीवाला तिचा डाव नाही कळला आणि तो पुरता फसून गेला,बिचाऱ्याला एकदम कुत्र्या-मांजराबरोबर जेवायला बसविले, हे बघताना मन मात्र एकदम खिन्न होतं…..

शेवटच्या चार ओळी तर अख्या आयुष्य समोर उभ करत…मास्तरांचं….स्वत:च्याच खुनाच्या गुन्ह्याखाली स्वत:ला अटक आणि मग फाशीची शिक्षा..,जिवंतपणीच आपला पुतळा गावात उभारलेला पाहून मास्तरची मान एकदम खाली जाते अन् साहजिकच मनात विचार आला असेल..”काय होतो मी अन् काय झालो मी? हे फक्त एका नर्तकीमुळेच..”

याची देही याची डोळा पाहिले मरण

मीच माझ्या हाती देवा रचिले सारण

माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली

कशी नशिबाने थट्टा आज मांडली!

शेवटी त्या नर्तकीला कळून चुकले होते की आपण एक भल्या माणसाला फसविले आहें,अन् माझ्यामुळेच एक भला माणूस फासावर चढतो आहें,म्हणून त्याला वाचवण्यासाठी ती मग सगळ खर-खर जगाला सांगायला जाते, पण तिथे पण नशिबाने डाव खेळला आणि तिची वाचा जाते…..आणि मग सगळं काही संपल म्हणून तीही प्राण सोडते..मग मास्तरलाही मग फाशीची शिक्षा होते,स्वत:च्याच खुनासाठी…!!

गाणे जास्त असल्यामुळे हा चित्रपट चांगला साडे-तीन चार तास चालतो आणि ह्या सगळ्यात वेळ कसा गेला कळलेच नाही.जेव्हा हा चित्रपट संपला तेव्हा जवळ-जवळ रात्रीचे २ वाजले होते..एक अप्रतिम चित्रपट पाहिल्यामुळे मनाला एक समाधान होते..आणि मग आम्ही असेच घरी निघालो..चित्रपट संपल्यानंतर कोणीही असे म्हटले नाही की हा चित्रपट चांगला नव्हता म्हणून…सगळे जन “लई भारीच्या”सुरातच होते..

फक्त चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा मनाला रुखरूख लागून जाते आणि त्या भोळ्या मास्तरची खरच कीव येते अन् ये सगळे एका नर्तकी मुळे झाले म्हणून वाईट वाटते..आणि दिग्दर्शकाने बाईच्या नादीच लागू नये हे एकदम उत्तम प्रकारे ठसवलं आहे ….!!

अप्रतिम कथानक,एक उत्तम रीतीने केलेले दिग्दर्शन, झकास गीते/संगीत आणि उत्कृष्ट अभिनय, ह्या सगळ्याचा जोरावर हा चित्रपट नेहमीच एक आवडता चित्रपट म्हणून आहें माझ्या मनात…आणि कायम  राहीलही….!!!

Advertisements

Entry filed under: Uncategorized. Tags: , , , .

एस.टी.महामंडळ अन् त्यांचे कर्मचारी….. मनाला भावलेल ……………!!

4 प्रतिक्रिया Add your own

 • 1. Gangadhar Mute  |  जानेवारी 11, 2011 येथे 10:00 pm

  छान लिहिलेय.
  मला पण हा चित्रपट फ़ार आवडला होता.

  उत्तर
 • 2. bhaanasa  |  जानेवारी 12, 2011 येथे 9:57 सकाळी

  शांताराम बापूंचा एक उत्कृष्ट चित्रपट. माननीय शंकर पाटील यांचे संवाद,जगदीश खेबुडकरांच्या शब्दांची व राम कदम यांच्या संगीताची मोहिनी आजही आहे. खरे तर कथानक फार काही हटके नाही पण सादरीकरण लाजवाब. मराठी चित्रनगरीतील एक मानाचा तुरा.

  उत्तर
  • 3. Atul  |  जानेवारी 12, 2011 येथे 3:16 pm

   धन्यवाद…आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहें….!

   उत्तर
 • 4. Rajaram Kshirsagar  |  फेब्रुवारी 18, 2011 येथे 11:41 pm

  ha lekh pharch sunder lihila ahe. purn PINJARA cinema ch kathanakch mandle ahe. Sunder.

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Trackback this post  |  Subscribe to the comments via RSS Feed


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे


%d bloggers like this: