विचार…एक विचार..एक उमेद

दिवस असाही येतो- जातो..सकाळपासून उदास वाटतंय…रोज रोज तेच आणि तेच..

निवडणुका आल्या..ह्याचा प्रचार ..त्याचा प्रचार, ह्याचे भाषण त्याचे भाषण…हा त्याला शिव्या देतो..आणि तो त्याला शिव्या देतो….कधी एकाच दगडात दोन पक्षी मारणे..काही काही..तीन तीन पक्षी पण मारतात..एकाच दगडात!!  असो… सगळे काही ऐकून असेच डोक्यात जातात……डोकं विचार करणे सोडून देते..म्हणते जाऊदे राव..कशाला ती डोकेफोड!!

सगळे काही मनाला पटत नाही अशातच मन निराश होतंय…..खूप काही असते … काय करावे सुचत नाही…

जीवाला निराश वाटत राहते…

उदास मनी हुरहूर असते..

शीण येईल जीवाला,

मन थकेल जीवाला

असतील धडा शिकवणारे…झाडे..

उन्हा-तान्हात उभे राहण्याचे बळ

मनाला समजावणारे….

होऊ नको निराश….

असेल येणारे क्षण आशेचे..स्वप्न पाहण्याचे…

असेल अपेक्षा जीवाला तुझ्याकडून…

अन तुलाही जीवनाकडून…………..

करशील सामना…आल्या संकटाना!!!

मार्च 10, 2014 at 10:14 pm यावर आपले मत नोंदवा

हरिश्चंद्रगड – एक प्रवास

नुकताच गेल्या रविवारी(११ मार्च) हरिश्चंद्र गडावर जाण्याचा योग आला, माझ्या गावापासून जवळ असूनही तिथे जाणे झाले नव्हते आजपर्यंत..म्हणजे तसं मनावर घेतलं नव्हत…

गेल्या काही महिन्यापासून तिथे जाण्यासाठी हालचाल चालू केली होती.. माझ्या मोठ्या बंधूचे सासरे(मामा) आहेत…ते नेहमी असे इकडचे तिकडचे  देव- देव करत असतात, कधी बसने तर कधी स्वत: सायकल वर (जवळचे असेल तर) , नाहीतर असंच कोणी एखादा मित्र भेटला तर मोटारसायकल वर जात असतात…त्यांच्या बऱ्याचश्या फेऱ्या होत असतात..अश्या ठिकाणी.. हरिश्चंद्रगड, अंकाई देवी, डोंगरगण,मढी आणि असेच छोटे-मोठे देव ते करत असतात..हरिश्चंद्रगडाला तर ते ५०-६० वेळा जाऊन आले आहेत..

मागे महिन्या–दोन महिन्यापूर्वी  असेच त्यांना म्हणालो होतो की मला पण हरिश्चंद्र गडावर यायचे आहे, तसं काही नक्की नव्हते की कोणत्या दिवशी जायचे पण..ते म्हटले होते की पाडव्याचा दिवशी किंवा त्याच्या आधी किंवा नंतर जाऊ……

शनिवारी (१० मार्च) ला रात्री त्यांचा एकदम फोन आला आणि  म्हटले उद्या(रविवारी)  सकाळी हरिश्चंद्रगडावर जायचे आहे….मी खरे म्हणजे शनिवारीच पुण्यावरून गावी गेलो होते…अंग जाम झाले होते प्रवासात..अगोदर जायची इच्छा नव्हती होत….पण नंतर विचार केला की..आली आहे संधी तर कशाला सोडायची…एकदा नाट लागले तर परत होणार नाही लवकर जाणे…म्हणून ठरवलं की जायचे…….

रविवारी सकाळी उठलो…जरा उत्साहात….सकाळचे कार्यक्रम उरकून लवकर आवरले….आपली गाडी(बाईक) काढली ९ वाजे पर्यंत मामांच्या घरी पोहचलो…..गुंजाळवाडीला….मी त्यांच्या घरी गेलो तर ते घरी नव्हते…सकाळी–सकाळी गावातल्या देवळात गेले होते…अर्धा तास थांबलो.. ते अर्ध्या तासाने आले..

आता त्यांचे जाणे म्हणजे आपल्यासारखे नसते..उठले की चालले..हरिश्चंद्रगडाचे  बरेचशे लोकं तिथे ओळखीचे आहेत…त्यांच्यासाठी..घरून कांदे,काही भाजीपाला घेतला..आम्हा दोघांच्या दुपारच्या जेवणासाठी चपाती-चटणी पण बांधून घेतली…

९:४५ ला आम्ही दोघे निघालो….ऊन वाढत चालले होते हळू-हळू, तरी पण काही वाटत नव्हते…एक नव्या ओढीने मी गाडी चालवत होतो..इकडच्या तिकडच्या गप्पा मारत….

जातं-जाता मामां मला बरीच माहिती देत होते..

११:३०  वाजेपर्यंत राजूरला पोहचले…तिथून किराणा दुकानातून, देवाला दिवा लावण्यासाठी काही तेल घेतले, अगरबत्ती, खडीसाखर ई. राजूर पर्यंतचा रस्ता मला तसं माहित होता, पण तिथून पुढचा रस्ता मला सगळा नवीन होता..जाताना रस्ता तसं चांगला आहे पण खूप वळणा-वळणाचा आहे आणि अरुंद रस्ता आहे…म्हणून गाडी पण दक्षतेने चालवावी लागते…

असंच तो रस्ता…आजूबाजूला भव्य डोंगर, दरी, ओढे,नाले…. ह्या रस्त्याने सगळे नवीन होते..मी पहिल्यांदाच जात असल्यामुळे…

मामांना पण सगळे रस्ते माहित, मध्ये लागणारे गाव सगळे काही माहित होते..

सूर्य डोक्यावर आलेला होता.. असेच मजल-दरमजल करत एकदाचे १२:०५ वाजता पोहचलो.. पाचनई ह्या गावी…हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी…..तिथेच एका मामांच्या ओळखीच्या घरी..आमच्या घरून आणलेले, कांदे, काही भाजी दिले, तिथे पाणी घेतले… ५-१० मिनिट थांबलो असेल….

हेच ते पाचनईगाव…गडाच्या पायथ्याशी, घरं तशी कमीच आहे ह्या गावात.

दुपारचे १२-२५ झाले होते. आता आमची मोठी कामगिरी बाकी होती…आम्हाला गड चढायचा होता..आमच्या पिशव्या घेतल्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाच्या भाकरी घेवून…..आमची गडाची वाट धरली..

हीच ती वाट गडाकडे जाणारी आणि..समोर दिसणारा गड….

कळसूबाई हरिशचंद्र गड अभयारण्य ची पाटी  आमच्या स्वागताला…अभयारण्यात भ्रमंती करताना ….ह्याच्या खालच्या ओळींकडे(सूचना) लक्ष न देता आम्ही पुढे निघालो…

हीच ती सुरवातीची वाट….आमच्यापुढे..तेथीलच स्थानिक तिघे जण चालले होते ते तिकडे गडाच्या दुसऱ्या बाजूला(जुन्नर तालुका परिसर) कामासाठी चालले होते…..एकजण तर त्यातला  अनवाणीच होता…..आणि ह्या लोकांचे,ह्यांच्या कष्टाचे.. जेवढे कौतुक करावं तेव्हढ कमीच होते…

सलाम ह्या अनवाणी पायांना…आणि त्या पायांच्या धुळीला..!!!

थोडीशी वाट चढल्यानंतर मागे हे दृश्य दिसत होते…सुरवातीला दम लागत होता…धापा टाकूनच पाय टाकत होतो…पण गड चढणं चालूच होते…

अजून थोडे वरती चढल्यानंतर………दिसणारा पायथा….अजूनच बारीक होत चाललेले…!

ही वाट खाच-खळग्याची….

ह्याच त्या डोंगर- कपारीतून वाट काढत रस्ता पार करतोय…..

ह्याच डोंगर –कपारीतून चालत…हळू –हळू आम्ही वाट सर करत होतो.

आता मात्र आम्ही थोडे थकलो होतो….म्हटले थोडा आराम करू..आणि आम्ही ह्या डोंगर-कपारीच्या सावलीत थांबलो..

हेच माझे सहकारी मामा….माझ्यापेक्षा कितीतरी वयस्क…पण बघा तो उत्साह…….चेहऱ्यावर थकवा अजिबातही नाही…….आणि असे कित्येक वेळा गड चढले आहेत हेच ते मामा…

मी..

असंच वाट काढत काढत…आम्ही गड चढतो आहे….

समोर दिसणारा गड…

वाटेवर…बरीचशी झाडे.आहेत…त्यावर लावलेल्या पाट्या…..झाडांच्या नावांच्या…आपल्या माहितीसाठी.

आमचा पायथा आता दिसेनासा झाला आहे…

गडावर शेळ्या वळणारी पोरं…..ह्यांच्या शाळा म्हणजे हेच….

असं मजल-मजल करत….आम्ही एकदाचे गडावर पोहचलो…१२:२५ ला निघालो ते…जवळ-जवळ १:३५ झाले होते….एक तास भर…चालल्यानंतर…आम्ही इथे पोहचलो.

हरिहरेश्वर मंदिर……पण इथे जाण्याअगोदर….आम्ही केदारेश्वर मंदिरात गेलो…

मुळा नदीचा उगम ह्याच मंदिरापासून…!!

इथे शिवलिंग ही एका गुहेत आहे….जिथे चाहुबाजूने पाणीच पाणीच आहे…चार खांबाच्या मध्ये हे शिवलिंग आहे…चार पैकी एकच खांब सध्या आहे..बाकी सगळे मोडकळीस आले आहे..

मामांनी इथे(एकदम थंड पाण्यात) अंघोळ करून….शिवलिंगाला हार, फुले, वाहिली…मनोभावे पूजा केली…

ह्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात आलो…हरिहरेश्वराच्या

ह्या मंदिरात मामांनी सर्वात प्रथम एक झाडू आणला सगळी साफ-सफाई केली…मी ही साफ सफाई करण्यास मदत केली…एवढा निवांत वेळ देवासाठी कधी देता येतो…अश्या निवांत वेळी गेल तरच…

आम्ही आणलेली फुले ह्या शिवलिंगावर वाहिली…हा.हा.किती सुंदर हा क्षण..

गर्दीच्या मोसमात..(शिवरात्रि च्या) इथे क्षणभर उभे राहल्या पण भेटत नाही…तिथे आम्ही चांगले निवांत बसलो होतो..सगळे शिवलिंग धुवून फुले, अगरबत्ती, दिवा लावून मनोभावे…शिवशंकराची…पूजा केली… किती….अमूल्य तो क्षण…..

पिण्याचे पाण्याची कुंडी….इथे स्वच्छ पिण्याचे पाणी आहे…जे कधीच आटत नाही.

बाजूला असणारे पाण्याची कुंडी..कदाचित येथील पाणी पूर्वी पिण्यायोग्य असेल..पण आता ते पाणी खराब झाले आहे.

गडावर असणाऱ्या भरपूर गुहा…ह्या गुहा अश्या बनवलेल्या आहे की इथे लोक राहू शकतात…..

आता इथून वरती असणारे….तारामांची(तारामती गड). सर्वात उंच टोक…मामांनी मला विचारले की तारामांची ला जायचे का….मी थोडा विचार केला..आणि म्हंटल आता आलो आहे तर जाऊ…..आजून ३०-४० मिनिटे…वरती तारामांची गड आहे…

हरिश्चंद्र गडावर असंच एक तास भर थांबलो असेल.नानातर आम्ही २:३० च्या दरम्यान तारामांची ला जायला प्रस्थान केले…

तारामांची ची वाट..गर्द दाट झाडी असलेली वाट २०-२५ मिनिट चाललो असेल….तारामान्चीच्या अर्ध्या वाटेवर आलो तर भूक लागली होती…म्हणून बरोबर आणलेली भाकर सोडली…

चपाती अन शेंगदाण्याची चटणी…मस्त झाडाची गार सावली…आहाहा अप्रतिम जेवण झाले..जिथे जेवण करायला बसलो तिथून एका बाजूला पिंपळगाव जोगा धरणाचे शेवटचे मूळ(टोक)  दिसत होते..

आणि बाजूलाच माळशेजचा घाट पण दिसत..होतं..

घाटातल्या गाड्या काडीपेटीसारख्या दिसत होत्या..

१५-२० मिनिटे जेवण आणि थोडा आरमा केला…३:२० झाले होते…..राहिलेला टप्पा पूर्ण करण्यासाठी….आम्ही निघालो…आता..हळू हळू करत….आम्ही वरती पोहचलो..अजून १०-१५ मिनिटात….

तो हा जोराच्या वाऱ्यावरती फडकणारा भगवा झेंडा….

हा झेंडा बघून नकळत काही ओळी सुचल्या मनात..

करितो मनाचा मुजरा तुला
..फडकत राहा असाच तू रे……
अभिमानाने फुलून येते छाती अमुची..
तुला असं बघून…||

येवो तुझे सत्व अमुच्या अंगी.
नसे गर्व…अंगी..
नको विसर पडू देऊ कर्तव्याची..
असू दे लीन, नम्रता मनी सदा…||

ह्या झेंड्यापासून उजवीकडे ….हरिश्चंद्र गड दिसत होतं….तर डावीकडे माळशेज परिसर्…पूर्वेकडे मुंबई कडचा भाग…असं म्हणतात की इथून  आख्खी मुंबई दिसते…पण मला वाटत अख्खी मुंबई नाही..पण रात्रीच्या इथे कल्याण-मुरबाडचे दिवे नक्कीच चमकतात…..

मुंबईचा परिसर!!

माळशेजचा परिसर!!

कोकणकडा..आणि आजूबाजूचा परिसर..!!

वर तारामांची वर असलेली शिवलिंग….दगडात कोरलेली…

गडावर मामा…

१०-१२ मिनिट आम्ही वरती होतो……आणि ह्या ज्या भावना होत्या त्या  शब्दात वर्णन करणं अवघड आहे…अप्रतिम ..किती उंचावर आलो ह्याची काहीच कल्पना नव्हती…पण नंतर जेव्हा वाचले तेव्हा कळले की ह्या गडाची उंची ४६७१ फूट आहे…… असाच ३:४० च्या दरम्यान आम्ही परतीचा प्रवास चालू केला…उतरताना  पाय लट-लट कापरत होते म्हणून एक काठी आधाराला घेतली…. हळू हळू आम्ही गड उतरलो…मनात एक आनंद घेवूनच..आणि परत ह्या गडावर यायचे हा निश्चय करूनच….!!

अजून एक शेवटचे लिहायचे राहिले, राजा हरिशचंद्र हा खूप सत्वशील होता,येथील गडाचे,येथील हवेचे एवढे सत्व आहे की, की आपले बरेचशे आजार आपोआप बरे होतात, असे मामा सांगत होते.आणि मला पण हा अनुभव आला..कारण ह्या गडावर जायच्या जवळ-जवळ १५ दिवस मला डोळ्याचा त्रास होत होता.(म्हणजे रांजणवडी  झाल्यासारखे वाटत होते,एक डोळा सुजला होता.) मी अगोदर डोळ्यात मेडिकल मधून औषध आणून डोळ्यात टाकले पण होते, पण एकदा बरे होऊन ते परत झाले होते..आणि मी ठरवलं होते की रविवारी ११ मार्चला डॉक्टर ला दाखवू म्हणून.. पण ११ मार्च ला मी नेमका हरिश्चंद्रगडावर आलो.. आणि मला नवल वाटले की माझे डोळे पूर्ण बरे झाले ..दुसऱ्या दिवशी.. …!!आणि मला वाटत की हा पूर्ण ह्या गडावरच्या वातावरणाचा,हवेचा परिणाम आहे..!!

हरिश्चंद्र गडाबद्दल माहित खालील लिंकवर आहे (साभार:विकिपेडिया)

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1

मार्च 21, 2012 at 11:40 सकाळी 5 comments

खवचट

(भाग १)

खवचट!!! खवचट ..हा शब्द पण उच्चारताना नेमका ‘च’ वरच जोर द्या..तसं जे खवचट लोकं असतात त्यांना ह्या गोष्टी सांगायची गरज नाहीये…तर आता खवचट ह्या शब्दाबद्दल काय लिहिणार…म्हणून अश्या माणसावर लिहावं..जे ह्या शब्दाचा पुरेपूर उपयोग करून घेतात…आणि बाकीच्या लोकांना पण त्याचा पूरेपर अनुभव देतात.

ज्यांच्यावर ह्या खवचटपणाचा प्रयोग होतो (किंवा बळी पडतात)जे ह्यांच्या खवचटपणाला काहीच प्रत्युतर देत नाहीत.. त्यांच्या तोंडाकडे पाहवत नाही….बिचारे…

पण दुसरा पण प्रकार आहे इथे……अगदी खवचट ला दुसरा खवचटच भेटला तर मात्र मग मज्जा येते…त्यातून एकतर भयंकर भांडण होते..नाहीतर काहीतरी विनोद तरी होतात….आणि ह्या खवचट लोकांत तिसरा भेटला तर अगदी विचारू नका…..

असेच काहीतरी खवचट लोकांचे खवचट उदाहरणे इथे देत आहेत…

प्रसंग १.

काही दिवसापूर्वी बसने प्रवास करत होतो…एका बसस्थानका वर बस थांबली…बसमधले प्रवासी काही उतरले, काही चढले…त्या प्रवासामागून लगेच नेहमीप्रमाणे वेफर्स, फरसाण,पाणी,फळं,उसाचा रस,चिक्की,  ई. जे काही असले ते घेवून चार-पाच जण आले…

            “चला वेफर्स,बिस्कीट….”

            “चला पाणी, पाणी, थंडगार पाणी…”

            असं सगळ्यांच ओरडणं चालूच होते..काही प्रवासी त्यांना जे पाहिजे होते ते घेत होते.. .

            तो पाणी बाटली वाला माझ्या सीट जवळ आला आणि ओरडू लागला ‘पाणी,पाणी म्हणून..’

             तेवढ्यात माझ्या जवळ बसलेले गृहस्थ…३०-३२ वय असलेले जाड भिंगाचे चष्मा घातलेले….त्यांना ह्या पाण्यावाल्याने विचारले की

            “देऊ का पाणी बाटली साहेब?”

साहेब काही एक नाही दोन नाही….त्यांनी लगेच आपल्या बॅगमध्ये हात घातला…चांगली १.५ लिटरची पाण्याची बाटली काढली..आणि घटाघटा चार-पाच घोट पाण्याचे घेतले….त्या बाटली वाल्याचा समोरच…आणि पाणी पिवून झाल्यानंतर  मोठा आवाज काढला घश्यातून… आणि एक कटाक्ष टाकला त्या पाण्यावाल्याकडे…..

बिचार तो पाण्यावला काय करणार …बिचारा निघून गेला पुढे…….मला आलेले हसू आवारात नव्हते….आणि ह्या माणसाला जसा आपण पानिपतची लढाई जिंकलो असंच वाटत होते……  आता काय बोलणार?

प्रसंग २.

कुठल्यातरी एका सरकारी ऑफिसच्या प्रसाधनगृहात दोन गृहस्थ आपापले विधी उरकून, त्या प्रसाधानगृहात असलेला तुटका आरश्यासमोर तयार होत असतात.

आरसा छोटा असल्यामुळे एका मागे एक उभे असतात.दोघांचेही वय ४०-४५ च्या दरम्यान असते, दोघेही एकमेकांना अनोळखी असतात. दोघांमध्ये एकच फरक असतो की,

एकाच्या डोक्यावर दाट  केस असतात त्यांचे नवा खंडेराव!. आणि दुसऱ्याच्या डोक्याचे पूर्ण विमानतळ   व्हायचे थोडेसेच बाकी असून, चार-पाच नावाला केस असतात, त्यांचे नाव तात्याराव!

तात्याराव आपले आरश्यात आपला चेहरा न्याहाळत होते..

तर तेवढ्यात ते खंडेराव खिश्यातून एक कंगवा काढतात… ..आरश्यासमोर होतात, आपले

केसाची स्टाईल मारत भांग पाडू लागतात…एक जोरदार कटाक्ष तात्यारावांच्या असलेल्या टकल्याकडे आणि उरलेल्या केसांकडे टाकून!!!

तात्यारावांनी हा खंडेरावाचा हा खवचटपणा  ओळखला…….ह्यावर तात्याराव शांत बसतील ते कसले…..ह्यांनी काय करावं…..

 ह्यांनी पण आपल्या खिश्यातून एक बारीकसा कंगवा काढला…..आणि एक जबरदस्त खुन्नस खंडेरावांना  दिली…..आपल्या चार-पाच केसांमध्ये कंगवा फिरवला…….आणि असे जोरात आवाज करून हसले की खंडेरावचा चेहरा बघण्यासारखा होता……खंडेरावांनी आपला कंगवा हळूच खिशात ठेवला व चालते झाले….. ह्याला म्हणतात…खवचटास महाखवचट!!!!

प्रसंग ३.

      भर उन्हात १२ च्या सुमारास दोघेजण मोटारसायकल वर चालले आहेत, गर्दीचा रस्ता, पायी चालणारेही थोडेफार लोक आहेच.ह्या मोटारसायकलवर जाणारे दोघे… ह्यांच्या मोटारसायकलीची पुढील लाईट लागला आहे……

गर्दीतून हे रस्ता काढत होते….पायी चालणारे माणसंही होतीच, त्यातच एक माणूस पायी चाललेला..थोडासा त्रस्त झालेला..आधीच उन्हाचा त्रास….त्यात ह्या मोटारसायकलीची लाईट डोळ्यावर चमकली…..ती मोटारसायकल जेव्हा जवळ आली ….

तेव्हा त्या मोटारसायकलस्वराला लाईट बंद करायला सांगावी म्हणून, हे पायी चालणारे गृहस्थ  हाताचा इशारा करून म्हटले…..

“साहेब ….लाईट चालू आहे….” 

तर त्या महाशयांचा प्रतिसाद बघा..

 “जाऊदे ना भो……….माझ्या बापाला ह्या लाईटच काही बिल येत नाही…………!!! “ असं खवचट  बोलून…पुढे निघाले….

 आता ह्या खवचटपणाबद्दल काय म्हणावे…..?????

(क्रमश:)

मार्च 15, 2012 at 6:53 pm यावर आपले मत नोंदवा

शब्द….!!!!

मन उदास असलं की…. काय करावे तेच सुचत नाही…

कसे आणि काय शब्द मांडायचे तेच सुचत नाही..

मन एकटं पडलेलं असतं ……काळ्या ढगांनी आभाळात गर्दी केल्यासारखी ….मनात साचलेलं दु:ख ….

कधी अश्रूंच्या रुपात कोसळेल काही नेम नाही…..!!!

अश्या वेळी कुठून मनात येतं कुणास ठाऊक….

हातात पेन आणि कागद घेऊशी वाटतात……..

सगळे परके …अन फक्त शब्दच जवळ वाटतात…

काय अन कसं लिहावं ..काहीच कळत नाही……

मनातही काही शब्द नसतात.

…..अश्यातच आपोआप पेन उचलला जातो… कुठेतरी कागदही सापडला जातोच सोबतीला….

उगाच काहीतरी लिहियाचे म्हणून इकडचे तिकडचे शब्द खरडायला सुरवात करायची…

का कुणास ठाऊक….हे खरडणच मनाला उमेद देते…

जगण्याची… सारं काही शब्दात मांडलं जात…

मनाची सारी जळमटं निघून जातात ..कुठच्या कुठे…

कसलं सामर्थ्य असावं ह्या शब्दात….?? की आपल्याच भावनाचे खेळ..?

काही असो…

पण हेच शब्द जवळचे वाटतात…. मन हलकं करणारे शब्द…!!!

सप्टेंबर 19, 2011 at 6:05 pm 4 comments

पाऊस….वेडं करणारा………………..!!!

पाऊस!!! ..पाऊस ….म्हटलं की  वेडं होणं आलंच…..

अगदी सुरवात करायची झाली  तर…

वळवाचा पाऊस… ते कुठेतरी लांब डोंगरावर काळे-काळे ढग जमा झालेले…

आता काही क्षणात धो-धो कोसळेल ..आणि सगळ ओलं-चिंब करून टाकेल…

असं वाटत असतानाच…जोराचं वादळ येतं…

वारा सगळे झाडे इकडे-तिकडे करतो…सगळी वाळलेले पाने गळून पडतात….काही झाडे कोसळतात…….सगळी धावपळ…

धो-धो वाटणारा पाऊस…….मात्र वादळ चार टपोरे थेंब घेऊन येतो……!!!!

ह्याच चार थेंबात…सगळा आसमंत दरवळून निघतो….एका मोहक सुगंधात…..ह्याच मातीच्या वासाने मन वेडं होतं…!!!!

असाच पावसाचा खेळ….चालू असतो…कुठे पडतोय….कुठे नाही..

आपला बळीराजा,अख्खा उन्हाळा पिऊन तप्त झालेले डोंगर आणि  धरणी माय,अन सगळी जीव-सृष्टी…

ह्याच्याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेली असतात…….आज पडेल उद्या कोसळेल..ह्या आशेने..

अश्याच काही दिवसांनी ह्याला ह्या सगळ्यांची कीव येते…अन हा मग कोसळतो…..अगदी धो-धो!!!!

सगळी जीवसृष्टी न्हाहून निघते….

झाडांची पाने…त्यावर पडणारे पाणी..

फुलांच्या पाकळ्यावर साचलेले पावसाचे थेंब…..

काळी-काळी डोंगर…पुन्हा हिरवीगार होतात…..डोंगरावरून वाहणारे ते धबधबे…

 पावसात ओलीचिंब झालेली …झाड्याच्या आडोश्याला बसलेली

सगळी पाखरं……..

थोडासा पाऊस उघडला तर ..आपल्या पिल्लासाठी..खायला काहीतरी गोळा करणारी पाखरं…….

अंगावर आख्खा पाऊस झेलणारी जनावरं..

आपल्या गोठ्याकडे…पळण्याची त्यांची झालेली धावपळ..!!!!!

खूप पाऊस पडला म्हणून शाळा  लवकर सुटलेली……..

आणि त्याच खुशीत असलेली शाळेची पोरं…

 मग घरी जाताना…होणारा पोरांचा दंगा…

दफ्तर भिजू नये म्हणून ..ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळेलेले….

रस्त्यावरच्या डबक्यामधले पाणी उडवत…

घरी जाणं…..!!!!

 कौलारू घरावरून पडणारं पाणी…….

ओलाचिंब झालेला….ओटा ….

भर चिखलाच्या भात खेचारात…. भाताची रोपं लावणारी शेतकरी माणसं…

…….कष्ट काय असतात..हे शिकवणारे त्यांचे जगणं…..!!!!

आक्खा उन्हाळा पाणी न पाहिलेल्या ओढ्याला भरभरून वाहताना पाहताना…

त्या पावसात उड्या मारणारी छोटी छोटी बेडकं….कुठून आली हि छोटी-छोटी बेडक..ह्याचे नेहमीच वाटणारे कुतहूल…

अन हि बेडकं वर आभाळातून पडली असं सांगणारी माणसं ….

कधी कधी छत्री असूनही..मनाला वाटलं म्हणून भिजणं………!!!

श्रावणातल्या त्या श्रावण सरीं……डोंगर दऱ्यातील ते दाट  धुकं…..

खूप पाऊस पडतोय म्हणून….घराच्या बाहेर न निघणं…

अन घरातच बसून चहा पिणं…..अन बाहेर पावसाकडे पाहत बसणं…!!!

पावसाळ्याच्या शेवटी…..

जाता-जाता परत तोच पाऊस…वादळ-वाऱ्यासहित पडणारा……

कुठे-कुठे गारासोबत पडणारा……!!!

पुढच्या वर्षी ..जोरात येणार म्हणून सांगणारा….!!!

जुलै 13, 2011 at 10:11 सकाळी 2 comments

मनसोक्त भिजणं……!!!!

पावसा बद्दल थोडेसे…..!!

भिजणं….पावसात भिजणं काय असतं? पावसात भिजणं एक एक आगळाच आनंद देऊन जाते..ज्याला तो लुटता आला..तो खरा सुखी माणूस… नाही तर पावसावर रडणारे बरेच भेटतात आपल्याला….

पावसात भिजणं …..एक असतं ते म्हणजे जबरदस्तीचे भिजणं… म्हणजे…उगाच आपण एखाद्या ठिकाणी बिना छत्रीचा गाठवून जातो…आणि मग आपली परवड होते..

अन् दुसरं भिजणं असते ते म्हणजे ….एक जाणून बुजून पावसात भिजणे….किंवा ऐनवेळी पावसात गाठलो तरी मनसोक्त भिजायचं….. पराकोटीचं आनंद देणारं…

एका भिजण्यात असते…ते म्हणजे उगाच पावसाला शिव्या देत…. म्हणजे ” काय जोर आलाय त्याला आता..” किंवा ” मेल्याला आताच यायचं होता..” किंवा अगदीच.. “थोडावेळ नसता आला तर काय झालं असतं” अश्याच काहीश्या शिव्या…..

अन् दुसऱ्या भिजण्यात असते…एक वेगळीच श्रद्धा.. पावसाबद्दल..अन् पावसाच्या प्रत्येक थेंबाबद्दल……!!!

एका भिजण्यात …उगाच आपल अंग चोरून….कसातरी…धावत पळत पाऊस चुकवायचं … ह्याकडे लक्ष…..

तर दुसऱ्या भिजण्यात तर मनसोक्त भिजणं आलं… पावसाचा प्रत्येक थेंब अंगावर हळुवार झेलत….रस्त्यावरची डबक्यातील पाणी पायाने उडवत… उगाच पावसाच्या आवाजात आवाजात मोठ-मोठ्याने …एखादा पावसाचं गाणं ओरडत चालायचा… ती एक वेगळीच नशा….मन अन् शरीर चिंब करणारं…..!!

एका भिजण्यात श्रद्धाच नाही….पावसाबद्दल आणि त्या थेंबाबद्दल…. तर साहजिकच…..जबरदस्ती भिजणारा….आजारी पडतोच….. कारण मानसिकताच तशी झालेली त्याची……मी भिजलो..मी भिजलो….आता आजारी पडणार….सर्दी होणार…आणि असेच…. अन् तसाच होतं……….

आणि दुसऱ्या भिजण्यात असणारी अफाट श्रद्धा…. आजारी पडण्याच काही मनात नसतं…..आणि मनसोक्त भिजणारा आजारी पडतही….नाही.. उलट पावसाची …एक वेगळीच शक्ती अंगात संचारू लागते…….एक टवटवीत मन करणारं.. मनसोक्त भिजणं…..!!!!…अगदी…मनापासून…..!!!!

जून 10, 2011 at 9:43 pm १ प्रतिक्रिया

जगदीश खेबुडकर

आज असेच ऑफिस मधून निघायच्या वेळेस २५-३० मिनिटे माझ्याकडे होती, म्हणून म्हटले esakal.com वाचून जावे…महत्वाच्या बातम्या एकदा नजरेखालून घालाव्या ..
असं म्हणून सकाळ पपेर वाचत होतो…..अचानक “जगदीश खेबुडकर यांचे निधन” ह्या बातमीकडे लक्ष गेले…आणि अचानक असे काळजात धस्स झाल्यासारखे वाटले…
एक आपला जवळचा माणूस आपल्यातून गेला असाच वाटले……..आणि काही वेळ मन जरास सुन्न झालं….. ..एक महान गीतकार..त्यांची महानता ती शब्दात कशी मांडता येणार….!!

ज्यांच्या लेखणीतून एकापेक्षा एक सरस गीते लिहिली गेली अश्या जगदीश खेबुडकरांची उणीव तशी भरून निघणे अवघडच..

मला जगदीश खेबुडकर केव्हा पासून कळायला लागले, ते मी आठवण्याचा प्रयत्न केला तर….मी जेव्हा पासून मराठी चित्रपट पाहायला लागलो तेव्हापासून सुरवातीला जेव्हा चित्रपट कलाकारांचे,निर्माते, दिग्दर्शक संगीतकार, गीतकार अशी ज्यांची नाव यायची.. त्यात नेहमी गीतकार म्हणून “जगदीश खेबुडकरांचेचं नाव दिसायचे आणि नंतर प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस त्यांचेच नाव बघायची सवय झाली……..त्यांचे ते गाण्याचे  शब्द…आणि त्यांना मिळालेली अप्रतिम शब्दांची साथ….सर्व काही आजही मनाला भावून टाकतात… खरच अशी माणस खूप दुर्मिळ असतात……
त्यांचे निसर्ग राजा ऐक सांगतो’, हे निसर्गगीत असो की “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’ हे भक्तीगीत असो….लावण्या असोत…पिंजरा चित्रपटातील लावण्या असो…..तर भन्नाट आहेत..
कधीही नकळत तोंडावर येतात…आणि मन प्रसन्न करून जातात…..सगळ कसे अप्रतिम..!!!

तर असे हे जगदीश खेबुडकर…एक महान गीतकार आज आपल्यात नाहीयेत….पण त्यांचे शब्द हे नेहमीच आपल्यासोबत  आहेत आणि राहतील..

जाता जाता त्यांचेच शब्द जगणं सांगून जातात…..

“प्राजक्ताच्या फुलासारखे जगताना दुसऱ्याच्या ओंजळीत सुगंधाचा दरवळ दिला की, मागे वळून पाहण्याची गरजच नसते”

भावपूर्ण आदरांजली..!!!

मे 3, 2011 at 10:53 pm यावर आपले मत नोंदवा

देवा तुलाही हक्क आहे ..!!

एक माणूस म्हणून आज कुठेतरी देवाच्या भक्तीत आपण कमी पडतो आहे असे वाटतयं..कारण माणसावर संकटं, दुःख  आली का मगच देवाचा धावा करायचा ही प्रवृत्ती वाढत चालली आहे ..मग अभिषेक, पूजा,महापूजा, शांती करणे इत्यादी अनेक कार्यक्रम केले जातात .. मग तिथे पाहिजे तेवढा पैसा पण ओतला जातो..पण रोक काही वेळा देवासाठी,देवाची भक्ती करण्यासाठी माणसाला वेळ नाहीये…..
जेव्हा देव,निसर्ग आपल्याला भरभरून देतो तेव्हा आपण देवाचे क्षणभर आभारही मानत नाही का,पण  रोज १५-२० मिनिटे वेळ देवासाठी द्यायला पण वेळ मिळत नाही …मिळत नाही म्हणण्यापेक्षा वेळ काढला जात नाही ……ह्यामुळेच जगात भूकंप,पूर,दुष्काळ,त्सुनामी वगैरे ही संकट येतात..ती कदाचित ह्याचीच फळ असावीत ….म्हणूनच मला वाटत की देवाला हक्क आहे त्रास देण्याचा, दु:ख देण्याचा…हेच काहीतरी शब्दात मांडण्याचा प्रयत्न..!!!

देवा तुलाही हक्क आहे

थोडसं रडवण्याचं…

कारण जेव्हा मी ह्या जगात येतो,

जेव्हा मी दिवसभर खेळत असतो

मस्ती करत असतो..हसत असतो…..

मी ह्या जगात आलो ते फक्त तुझ्या तुझ्या कृपेने हेही मला माहित नसतं..

– एक बाळ

देवा तुलाही हक्क आहे

चालत्या गाडीला बंद पाडण्याचा..

कारण हीच गाडी जेव्हा धावत असते तुझ्या कृपेने..

तेव्हा नाही मानत मी तुझे आभार.

–एक  वाहनचालक

देवा तुलाही हक्क आहे

दिवसभर उन्हा-तान्हात वाट चालणारा मी

मला मग तहानेने व्याकुळ करण्याचा…

कारण त्याशिवाय तर मला “पाणी जीवन आहे ” ह्याचा अर्थ कळत नाही

-एक वाटसरू

देवा तुलाही हक्क आहे

कधी-कधी आम्हाला नापास करण्याचा

कारण वर्षभर तू आम्हाला माहीत नसतो

माहित होतो ते फक्त परीक्षेच्या वेळेसच..

-एक विद्यार्थी

देवा तुलाही हाक आहे

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पाडण्याचा

कारण तू जेव्हा भरभरून देतो आम्हाला,

तेव्हा आम्ही क़्वचितच देवळात येऊन तुला नारळ फोडतो..

-एक शेतकरी

देवा तुलाही हक्क आहे

जेव्हा सुट्टी पाहिजे असते,

तेव्हा ती न मिळवून देण्याचा

कारण जेव्हा आम्हाला सुट्टी असते

तेव्हा आम्ही सिनेमाला जाण्याला पहिली पसंती देतो

मंदिरात जायला आम्हाला वेळ नसतो.

-एक नोकर

देवा तुझाही हक्क आहे

कधी-कधी माझी अन् तिची भेट न होऊ देण्याचा..

कारण आम्ही दोघं जेव्हा भेटतो तेव्हा आम्हाला सारं जग विसरायला होतं..

अगदी तुला सुद्धा..

-एक प्रेमी

देवा तुलाही हक्क आहे

आख्खा समुद्र पालथा घालूनही

एकही मासा न मिळून देण्याचा

कारण जेव्हा टोपलं भरून मासे मिळतात तेव्हा

मी क्वचितच  असं म्हणतो देवा हे फक्त तुझ्यामुळेच

-एक मासेमारी करणारा

देवा तुझाही हक्क आहे

म्हातारपणी नको ते आजार देण्याचा,

कारण आयुष्यभर जनतेच्या सेवेच्या नावाखाली,

जनतेचेचं पैसे खिशात टाकले,अन् जनतेलाच लुबाडण्याचे काम केले,

तेव्हा  नाही भीती वाटली आम्हाला तुझी..

-एक भ्रष्ट राजकारणी

देवा तुझाही हक्क आहे

आयुष्यात दु:ख देण्याचा ,संकट देण्याचा

कारण हीच दु:ख, संकटं आम्हाला बळ देतात

जगण्याला ..अन् जगाला गवसणी घालायला..

अन् देवा हा तुझाच हक्क आहे

जीवन हे जगता-जगता कोणत्या क्षणी संपवायचं….!!!

-एक माणूस

मार्च 18, 2011 at 11:04 pm १ प्रतिक्रिया

जगणं डोंगरांच !!!

जळती डोंगरं बघितली का माझं मन अगदी भकास होऊन जातं..सताड डोळ्यांन वरती देवाकड बघत असल्यासारखं ……ह्याचं रूप!!!!

दरवर्षी उन्हाळ्याचे दिवस लागले की डोंगरांचं जगणं बघितलं की मन मन उदास होऊन जातं….कुठे पेटवून दिलेली डोंगर तर कुठे आपो-आपोआपच उन्हानं भाजलेली डोंगर….लहानपणी दूर कुठेतरी संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला की,डोंगरावर लाल-भडक जाळ दिसला की डोंगराला आग लागली असं वाटायचं..पण नंतर कळायला लागली की आग लागत नसे,ती लावली जायची…..डोंगरावरचं सारं वाळलेले गवत,पाला-पाचोळा,काटे-कुटे जाळून टाकायची…….चैत्राचा महिन्यात जिथे नुकतीच पालवी फुटलेली झाडं आहेत ती पण ह्या आगीत होरपळून निघणारी….

पावसाळ्यात ह्याच डोंगराचं रुपडं बघितलं का मन कसा हरखून जातं..

….सारा डोंगर परत हिरवागार……….सगळी प्राणी,पाखरं,फुलपाखरं,मनसोक्त जीवन जगणार….फुलपाखरं आनंदान ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायला तयार…..पाखर आपापली घरट बांधून पिल्लं वाढवणार……शेतकऱ्यांचे जनावराची डोंगरावरच्या गवताना पोटं फुगणार……. अख्खा पावसाळा हा डोंगर कसा हिरवागार झाडा-झुडपांनी सजलेला….खारुताई इकडून तिकडे उड्या मारणार…लहान लहान किडे,मुंग्या-मुंगळे आपला निवारा करणार..मोरांचे नाचणं पावसाच्या सरीवर पडताना…..धो-धो वाहणारे धबधबे…..पावसाच्या पाण्याला वाट करून देणारं डोंगर…..वाटलंच तर स्वतःला खाच-खळगे करून घेण…सगळ काही भरभरून देणारा..आपल्याजवळ असणार सगळ देणारा..अगदी किड्या-मुंगीपासून अगदी माणूस प्राण्यापर्यंत सगळ्यांना भरभरून देणारा…….अश्या वेळी मनाला प्रश्न पडतो….एवढ्या डोंगराळ,खडकात कुठून एवढा गवत-गबाळाच बी पडतं कुणास ठाऊक……सगळी जमात कशी आनंदानं जगतात……..अगदी ६-७  महिन्याचेच जगणं म्हणाव ह्या डोंगरांच …पावसाळ्याचे ३-४ महिने अन् हिवाळ्याचे २-३ महिने……पण ह्या ६-७ महिन्यातच  भरभरून देण ….बाकी उन्हाळा लागला की मग मात्र हीचं डोंगर जाळली जातात, नाहीतर उन्हानं अंगाची लाही लाही होऊन पुरती भाजून तरी जातात…….आतापर्यंत अंग-खांद्यावर नाचणारी पक्षी, बागडणारे फुलपाखर, डोंगराच्या खुशीत येऊ राहणारी नाना-तऱ्हेचे किडे,मुंगळे अन् मुंग्या कुठतरी हरवून जातात, पाखरांनी केलेली घरट रिकामी, ओस पडलेली…त्यांची पिल्लंही उडून गेलेली……….झाडही एकतर करपून गेलेली नाहीतर जाळून खाक झालेली…दरवर्षीचेच हे जीणं डोंगरांचं………..!!!

साऱ्या जगाला  एक जगणं शिकवणारे ह्या डोंगराचं जगणं…..

जीवन जगायचं असतं सुख-दुःखाचं गणित ध्यानात ठेवूनच

जसा पावसाळा आहे ..म्हणजे सुखचं सुख आहे…

तसं दुखही आहेच..जसा उन्हाळा आहे..

उन्हाळा असतो ते आपल्याला कणखर बनवण्यासाठी….

आलेल्या संकटाना सामोरं जाण्यासाठी…

वेळ आली तर उनही झेलायचं असतं …..थोडा धीर धरायचा असतो..

कारण उन्हाळा हा आपल्याला कायम सोबत करणार नाही..त्यालाही त्याचे आयुष्य आहे…!!!!

अन् पावसाळा असतो ते भरभरून आनंद लुटण्यासाठी..ऊत-मात न करता,

अन् भरभरून आनंद देण्यासाठी……

आपल्या परीने जेवढा आनंद जगाला देता येईल तेवढा देणं..कारण पावसाळाही चिरंतर टिकणारा नसतो…

अन् त्यालाच कदाचित सुख म्हणत असाव………!!!

मार्च 1, 2011 at 8:26 pm 4 comments

ह्या जगण्याच्या शाळेत…!!

मराठी प्राथमिक शाळा

असं आयुष्य जिथे फक्त माहित असतं

त्याला फक्त घर आणि शाळा

ज्या घरी त्याला नसतं कसलं टेन्शन

आई-वडील म्हणजे आपला ईश्वर ..आपला सारं काही पाहणारे..!!

आणि ज्या शाळेत असतात त्याचे फक्त दोनच शत्रू..

एक म्हणजे अभ्यास आणि दुसरे म्हणजे त्याचे गुरुजी ..

झालेच तर त्याची भावंड आणि गल्लीतले पोरं …भांडण करण्यासाठी…कसल्याही शुल्लक कारणावरून!!

सुट्टीच्या दिवशीच भरभरून गृहपाठ देणारे गुरुजी..

अ आ इ ई..वदवून घेणारे अन् पाढे पाठ करून घेणारे गुरुजी…कित्येकदा

नाही जमलं तर आहेच हातावर छडी अन पाठीत धपाटे….!!

अश्या गुरुजींची नुसती आठवण जरी काढली तरी चीड आणणारे..

अशातच चौथी कधी पार होते कळतच नाही…

आणि मग पुढे असते ती पाचवी..

माध्यमिक शाळा

ह्या शाळेतही त्याचे शत्रू बदलत नाही

फक्त त्यांचे स्वरूप बदलतं…..

अभ्यास नावाच्या शत्रुमध्ये असते ते इंग्रजी शिकण्याचं आणि इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करणं..

गणितं सोडवण….विज्ञानाचे सिद्धांत, भूमितीचे प्रमये पाठ करणं….

ह्या शत्रूला मित्र म्हणजे सर…..मित्र म्हणण्यापेक्षा अभ्यास नावाचा शत्रू अस्तित्वात असूच शकत नाही ह्यांच्याशिवाय…!!

इथेही त्यांच्या जोडीला असतात ते छडी आणि धपाटे…!!

ह्यांच्याच परिश्रमामुळे(सरांच्या छडी,धपाटे..इ.मुळे)दहावी होतो हा चांगले मार्क मिळून..

आणि मग सुरु होते कॉलेज जीवन..

जुनियर कॉलेज

शाळेत असेपर्यंत कॉलेजला कधी जाईल असं व्हायचं…

कॉलेजच जीवन, तिथले वातावरण सगळ असं की मन अगदी हुरळून जायचं.

जेव्हा कॉलेजला गेला तेव्हा कळायला लागल कॉलेजचे जीवन……

वर्गात थांबण्यापेक्षा वर्गाबाहेरच जास्त थांबणं …टवाळक्या करणं…..

दफ्तर न्यायचा काही विषय नाही…असलीच तर एखादी वही असायची….

त्याला कारणही तशीच…

कॉलेजमधले सर वर्गामध्ये शिकवण्याचा कंटाळा करतात …

तेच सर मात्र क्लासेसला जीव तोडून शिकवायचे…..

हे पाहिल्यानंतर मात्र चीड यायची…..आणि मग आठवण यायची ती शाळेतल्या गुरुजींची अन सरांची!!

कितीही वेळा पाढे चुकला तरी त्याचे गुरुजी जीव तोडून पाढे शिकवायचे…

नव्या-नव्या पद्धती सांगायचे पाढे पाठ करण्याचे……

अन न कंटाळता पाढे पाठ करून घ्यायचे…आता त्यांची मेहनत आठवली का त्यांचं मोठेपण समजायचं.

कॉलेजला मात्र कसलाच मार नसायचा …

इथे मात्र शत्रू बदलले होते…

कॉलेजच्याच एखाद्या पोरीवरून त्याच्याच एखादा जिगरी मित्र त्याच्याशी बोलत नसतो..

नाहीतर एखादा उगाचच भाईगिरी करत त्याला धमक्या द्यायचा असतो..

करण फक्त एखादी पोरगी..!!!!

अशातच बारावी होते…अन मग चालू होतो आणखी एक प्रवास…..

सिनियर कॉलेज…..

इथे शिकवणे हा धर्म नसतो..

आणि शिकवले तरी त्याच्याकडे लक्ष देणे म्हणजे पाप असते…

मग काय इथंही चालू होते तेच ते जगण ….कॉलेजला येण..नुसतं नावाला..

जेवढे जमतं तेवढे शिकणं स्वतःहून …..बाकी सोडून देणे.

इथेही शत्रू असतात,

आतापर्यंत सोबत असणारे गल्लीतले मित्र ,गावातले मित्र बरोबर नसतात..

सगळ काही नवीन वातावरण असतं.. त्यांच्याशीच जमून घेणे अवघड असतं..

तरीही त्यात हा जगणं शिकतो…नव्या मित्र-मैत्रिणी करतो…..

जगण्याचा आनंद शोधत असतो,

असाच सगळ पुरं करत हा होतो ग्रज्युएट!!!

मग सुरु होते खर जीवन

आतापर्यंत वाटत होते कधी हे शिक्षण सुटेल म्हणून …

जेव्हा सुटतं तेव्हा चालू होते जगण्यासाठी धडपड…

नोकरीसाठी वणवण…..

जीवनातल्या जबाबदाऱ्या अंगावर पडू लागल्या की…

सारं महत्व कळतं आपल्या आई-बापाचं……त्यांनी घेतलेल्या कष्टांच!!!

आणि मनोमन वाटतं परत घेऊन चला मला त्याच

मराठी शाळेत  अन् त्याच माध्यमिक शाळेत…..

…….जिथे मार बसला तरी चालेल म्हणून…

जिथे बघायचे आहे मला जीव तोडून शिकवणारे गुरुजी अन् सर….

अन् शाळा सुटल्यावर आईच्या खुशीत मला माझी स्वप्न रंगवायची आहेत…

उद्याची……!!!

अन वडिलांच्या धाकाखाली राहूनही दंगा करायचा आहे….

तरीही मला तेच जीवन जगायचे आहे…

आजची अन उद्याची कसलीही चिंता नसलेली…मनसोक्त जगायचं आहे…. ह्या जगण्याच्या शाळेत…!!

फेब्रुवारी 18, 2011 at 10:50 pm 5 comments

Older Posts


मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी !!

Marathi Mandali!

baliraja.com

जगभरातील वाचकांची ठिकाणे